नागपूर : उन्हाची तीव्रता वाढतच चालली आहे. माणसे जिथे पाण्यासाठी तहानलेली असतात, तिथे प्राण्यांची स्थितीही त्यातून वेगळी नसते. फरक एवढाच की माणसांना पाणी सहज उपलब्ध होते आणि प्राण्यांना मात्र पाण्याच्या शोधात त्यांच्या अधिवासाबाहेर पडावे लागते. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघ पाण्याच्या शोधात त्याच्या मूळ अधिवासाबाहेर पडला आणि थेट रस्त्यावर आला. मग काय! रस्त्यावरुन जाणारी वाहनेही या वाघाला पाहून जागीच थबकली. त्यांनी त्या वाघाला वाट मोकळी करुन दिली आणि त्या वाहनांकडे जणू कृतज्ञतेचा कटाक्ष टाकत तो वाघ देखील ऐटीत रस्ता ओलांडत त्याच्या मूळ अधिवासात परत गेला. वन्यजीव अभ्यासक व छायाचित्रकार दीप काठीकर यांनी हे चित्रीकरण केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राण्यांसाठी नैसर्गिक तसेच कृत्रिम पाणवठ्याची व्यवस्था केली असली तरीही उन्हाची तीव्रता आणि तहान यामुळे वाघ जंगलाबाहेर पडतात. त्यामुळे आता जंगलातील पर्यटकांनाच नाही तर जंगलाबाहेरच्या वाटसरूंना देखील सहज व्याघ्रदर्शन होण्यास सुरुवात झाली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पालागत सीताराम पेठ मोहर्ली या मार्गावरून जाणाऱ्या रस्त्यावर वाहनासमोर अचानक वाघ आला आणि ते वाहन जागीच थांबले. ताडोबातील या वाघाने क्षणभर त्या वाहनाकडे कटाक्ष टाकला आणि रस्ता ओलांडत तो जंगलात निघून गेला. राज्यात सहा व्याघ्रप्रकल्प आहेत आणि या सहा व्याघ्रप्रकल्पापैकी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात सर्वाधिक वाघ आहेत. या व्याघ्रप्रकल्पातील वाघांचे अनेक किस्सेही आहेत.

व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातच नाही तर बफर क्षेत्रातही सहज व्याघ्रदर्शन होत आहे. किंबहूना गाभा क्षेत्रापेक्षा बफर क्षेत्रातील वाघांनी पर्यटकांना आकर्षित केले आहे. या बफर क्षेत्रातील छोटा मटका, नयनतारा अशा पर्यटकांनीच नावे दिलेल्या वाघांचे तर अनेक किस्से आहेत. त्यामुळे भारतातीलच नव्हे तर भारताबाहेरील पर्यटक आणि सेलिब्रिटींनी त्यांचा मोर्चा या व्याघ्रप्रकल्पाकडे वळवला आहे. दरवर्षी लाखो लोक या व्याघ्रप्रकल्पाला भेट देत असतात. व्याघ्रप्रकल्पाबाहेर देखील आता वाघांची संख्या वाढीस लागली आहे.

त्यामुळे कित्येकदा गावकऱ्यांना सहज व्याघ्रदर्शन होते. बरेचदा या वाघांनी गावकऱ्यांचा रस्ता देखील अडवून ठेवल्याचे दिसून आले आहे. कधी अचानक दुचाकीसमोर वाघ आला आहे, तर कधी चारचाही वाहनासमोर तो आला आहे. ताडोबातील मोहर्ली परिसरात वाघांची संख्या अधिक आहे. याच परिसरात दोन दिवसांपूर्वी वन्यजीव अभ्यासक दीप काठीकर त्यांच्या वाहनाने जात असताना सीतारामपेठ मोहर्ली रस्त्यावर त्यांना व्याघ्रदर्शन झाले. अनपेक्षित झालेल्या व्याघ्रदर्शनाने ते सुखावले. वाघाने सहजपणे त्यांच्या वाहनाकडे एक कटाक्ष टाकला आणि रस्ता पार करत तो जंगलात निघून गेला.