नागपूर : बहेलिया वाघ शिकार प्रकरणात कोट्यवधींची उलाढाल समोर आली आहे. वाघांची शिकार करून कातडीसह इतर अवयव परदेशात विक्री करताना कोट्यवधींची उलाढाल झाली. दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेला मिझोराम येथील आरोपी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. म्यानमारमधून भारतात पैसे आणण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. दरम्यान, वाघांच्या अवयवांसाठी हवालाच्या माध्यमातून भारतात पैसा येत असल्याची कुजबूज खात्यात असून या चौकशीत आता सक्तवसुली संचालनालय सहभागी होण्याची दाट शक्यता आहे.

मिझोरम येथून दोन दिवसांपूर्वी एका आरोपीला अटक करण्यात आली. त्याला २५ फेब्रुवारीपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे. मिझोरममधील हा रहिवासी असून म्यानमारमधून तो भारतात पैसे आणत होता. त्या मोबदल्यात वाघाची कातडी आणि इतर अवयव पोहोचवले जात होते. वाघांच्या अवयवांच्या विक्रीसाठी हा पैसा वापरला जात होता. या व्यक्तीकडून आर्थिक व्यवहाराचे मोठे घबाड समोर येण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे हे प्रकरण सोपवले जाणार, अशीही चर्चा खात्यात आहे. मात्र या विभागाकडे किंवा सक्तवसुली संचालनालयाला यात सहभागी करून घेण्यापेक्षा वनखात्यातील वाघाच्या संरक्षण व संवर्धनाला समर्पित अधिकाऱ्याची चमू या प्रकरणाच्या चौकशीत सहभागी करून घेण्याची गरजही व्यक्त केली जात आहे.

२०१३च्या बहेलिया वाघ शिकार प्रकरणात मेळघाट वन्यजीव गुन्हे नियंत्रण कक्ष तसेच काही अधिकाऱ्यांनी जीवावर उदार होऊन या प्रकरणाचा मागोवा घेतला आणि तब्बल १५० आरोपींना त्यांनी अटक केली. अशाच अधिकाऱ्यांच्या चमचे याठिकाणी स्थानांतरण करून त्यांच्या हातात चौकशीची सूत्रे सोपवल्यास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग किवा सक्तवसुली संचालनालयाची गरज भासणार नाही. दरम्यान, वनखात्यातील वरिष्ठ अधिकारी ही बाब कितपत गांभीयनि घेतात, यावर सर्वकाही अवलंबून आहे. तपास यंत्रणेत रस असणारे अधिकारी असतील, तरच या प्रकरणातून काहीतरी चांगले घडेल, असेही खात्यातील अधिकारी बोलत आहे.

दोन वाघ मारल्याची कबुली

रणजित बावरिया या बहेलिया शिकाऱ्याचा मुलगा सोनू सिंग याने गोंदिया-बालाघाटच्या सीमेवर दोन वाघ मारल्याची कबुली दिली. गोंदियाची चमू सोनू सिंग याला घेऊन बालाघाट येथे गेली आहे. तर या प्रकरणातील सर्व आरोपींना पाच मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Story img Loader