चंद्रपूर : जंगलात मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या एका वृद्धावर वाघाने हल्ला करून ठार केले.ही घटना रविवार (ता. १३) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास तालुक्यातील चिचखेडा जंगल परिसरात घडली. मृताचे नाव विनायक विठोबा जांभुळे (वय ६० रा. चिचखेडा) असे आहे.

ब्रह्मपुरी तालुका मुख्यालयापासून २० किमी अंतरावर जंगलव्याप्त भागात चिचखेडा हे गाव वसले आहे. या गावातील विनायक विठोबा जांभुळे हे गावापासून एक किमी अंतरावर जंगलात मोहफुल वेचण्यासाठी रविवारी गेले होते. मोहफुल वेचत असतानाच जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला करून ठार केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह काही अंतरावर सरपटत नेला. या घटनेची माहिती मिळताच ब्रह्मपुरी वनविभागाच्या उत्तर वनपरिक्षेत्राचे अधिकारी सचिन नरड, क्षेत्र सहाय्यक शेंदूरकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला.

मृतदेह शवविच्छेदनाकरिता येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. मृताच्या वारसांना तातडीची मदत म्हणून वनविभागाच्या वतीने २५ हजार रुपये रोख रक्कम देण्यात आली आहे. पाळीव प्राण्यांवर वाघाचे हल्ले नित्याचेच झाले आहे. यापूर्वी देखील मानवी जिवीतहानी देखील झाली आहे. त्यामुळे वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सरपंच संजना घुटके यांनी केली.