चंद्रपूर : बल्लारपुरच्या जंगलात बांबू काढण्याचे काम करणाऱ्या मजुरावर वाघाने हल्ला करून त्याचा बळी घेतला. दरम्यान भक्ष्याजवळ बसलेला वाघ तब्बल ६ तास हलला नाही.ही घटना मंगळवारी घडली. सायंकाळी चार वाजता वाघाला पिंजऱ्यात टाकण्यात आले. लालसिंग बारेलाल मडावी (५७) असे मृताचे नाव आहे. तो मध्य प्रदेशातील मांडला जिल्ह्यातील बिछाया तहसील अंतर्गत माणिकपूर माळ (बेहराटोला) गावचा रहिवासी आहे.
मकर संक्रांतीच्या दिवशी (१४ जानेवारी) बल्लारपूर येथील आरक्षित वनपरिक्षेत्र क्रमांक ४९३ मध्ये बांबू काढण्याचे काम लालसिंग हे बल्लारशाह वन परिक्षेत्रात करीत होते. वाघाने त्यांच्यावर हल्ला करून बळी घेतला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक व बल्लारशाहचे वन परिक्षेत्र अधिकारी पथकासह घटनास्थळी पोहोचले. पाहणी केली असता लालसिंग मडावी यांच्या मृतदेहाजवळ वाघ बसला होता. वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वाघ वन कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता.
हेही वाचा…नागपूर : खळबळजनक! मानसोपचार तज्ज्ञाकडून शंभरावर मुली-महिलांचे लैंगिक शोषण…
मृतदेहाजवळ वाघ बराच वेळ बसल्याने बल्लारपूरच्या पथकाला दुपारी चार वाजता पाचारण करण्यात आले. ताडोबाच्या वन्यजीव उपचार केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी कुंदन पोडशलवार यांच्या मार्गदर्शनाखाली नेमबाज वनरक्षक अविनाश फुलझेले यांनी वाघाला जेरबंद केले.वाघाला तपासासाठी वन्यजीव उपचार केंद्र, चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. वाघ हा नर प्रजातीचा असून त्याचे वय सुमारे ४ वर्षे आहे. त्यानंतर सदर व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यासमोर पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पोलीस विभागाच्या ताब्यात देण्यात आला. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत देण्यात आली.
ही कारवाई बल्लारशाह वन परिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांनी मध्यचांदा वनविभाग चंद्रपूरच्या उप वनसंरक्षक श्वेता बोड्डू यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय वन अधिकारी राजुरा पवनकुमार जोंग व सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली पार पाडली.
हेही वाचा…नागपूर : मकरसंक्रांतीला पतंगबहाद्दरांचा रस्त्यावर धिंगाणा! तब्बल १७ जण रुग्णालयात…
जंगलात जाऊ नका
बल्लारशाह-कारवा वनसंकुल भक्षक वन्यजीवांनी भरलेले आहे. नागरिकांना जंगलात न येण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे