चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यातील बेलगाव मुरपार जंगलातील शेतशिवारात वाघाने मुलाच्या डोळ्यासमोर वडिलांचा बळी घेतला. ही घटना सोमवार, ८ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली. दुर्योधन जयराम ठाकरे (४९) असे मृताचे नाव आहे.

आरमोरी तालुक्यातील शिवनी येथील दुर्योधन ठाकरे यांची शेती ब्रम्हपुरी तालुक्यातील उत्तर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या बेलगाव येथे आहे. सोमवारी ते आपल्या २० वर्षीय मुलगा आशीषसह शेतात गेले होते. मुलगा शेळीच्या चाऱ्यासाठी झाडाच्या फांद्या तोडण्याकरिता झाडावर चढला. दुर्योधन ठाकरे खाली फांद्या जमा करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून त्यांना फरफटत नेले. हे थरारक दृश्य उघड्या डोळ्यांनी पाहणारा आशीष पूर्णत: घाबरून गेला. दुर्योधन ठाकरे यांचा मृतदेह दक्षिण वनपरिक्षेत्राच्या हद्दीत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

Story img Loader