नागपूर : राष्ट्रीय महामार्गावरील उपशमन योजना आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला त्याचे नसलेले गांभीर्य यामुळे मंगळवारी पुन्हा एका वाघाचा अपघाती मृत्यू थोडक्यात टळला. राष्ट्रीय महामार्ग सहावर भंडारा जिल्ह्यातील साकोलीच्या आधी ही घटना घडली. यापूर्वीदेखील राष्ट्रीय महामार्ग सातवर दोनदा वाघाचा अपघाती मृत्यू टळला आहे.
हेही वाचा – अखेर “तारू” “बजरंगा”वर भारी पडला…
हेही वाचा – भंडारा : ‘आय एम सॉरी मम्मी… लव्ह यू’, आईला मेसेज पाठवून विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल
राष्ट्रीय महामार्ग सहावर गेल्या १५ वर्षांपासून वन्यप्राण्यांसाठी असणाऱ्या उपशमन योजना प्रलंबित आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला तर त्याचे गांभीर्य नाहीच, पण वनखात्यालाही गेल्या १५ वर्षांत हा मुद्दा लावून धरावा वाटला नाही. नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पाला लागून हा महामार्ग आहे. यापूर्वी अनेकदा या महामार्गावर बिबट्यासह इतरही अनेक वन्यप्राणी मृत्युमुखी पडले आहेत. मात्र, ना प्राधिकरणाने ही बाब गांभीर्याने घेतली, ना वनखात्याने. या महामार्गावर उड्डाणपुलासह भूयारी मार्गदेखील प्रस्तावित आहेत. यातील काही उपशमन योजना अजूनही कागदावर तर काही उपशमन योजनांचे काम कासवापेक्षाही संथगतीने सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच या महामार्गावर व्याघ्रदर्शन झाले होते. तर मंगळवारी पुन्हा एकदा एक वाघ हा महामार्ग ओलांडताना दिसून आला. वाघ हा महामार्ग ओलांडत असतानाच दोन्ही बाजूने दोन मोठे ट्रक वेगाने या मार्गावरून गेले आणि महामार्ग ओलांडणाऱ्या वाघाचा मृत्यू थोडक्यात टळला.