यवतमाळ – जिल्ह्यात वाघ दिसणे ही आता कौतुकाची गोष्ट राहिली नसून, चिंतेचे कारण झाले आहे. नरभक्षक टी -९ वाघिणीच्या मृत्यूसोबत ही दहशत संपेल असे वाटत असताना जिल्ह्यात वाघांचा वावर वाढल्याने नागरिक दहशतीत आहेत. शनिवारी वणी तालुक्यातील निंबाळा या गावी जलाशयाच्या काठी वाघाने ठिय्या दिला. त्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. अखेर वनविभागाने या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले असून, हा वाघ परिसरातच भटकंती करत आहे.
वणी – यवतमाळ मार्गावरील निंबाळा (रोड) गावालगत शनिवारी या पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. सकाळी १० वाजताच्या सुमारास निंबाळा येथील रहिवासी अमित पिंपळशेंडे हे त्यांची गुरे घेऊन शेताकडे निघाले होते. त्यांच्या शेताजवळच एक तलाव आहे. या तलावाच्या काठावरच अमित पिंपळशेंडे यांना वाघ बसलेला आढळला. वाघाला पाहताच त्यांनी गावाकडे धाव घेत गावकऱ्यांना माहिती दिली. आधी गावकऱ्यांना ही गोष्ट खोटी वाटली. मात्र काही ग्रामस्थ तलावाकडे गेले, तेव्हा तिथे वाघ आढळला. ग्रामपंचायत सदस्य मनोज ढेंगळे यांनी तातडीने ही माहिती वनविभागाला दिली. वणी येथील वनविभागाचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यापाठोपाठ मारेगाव व पांढरकवडा येथील पथकदेखील तेथे पोहोचले. ज्या ठिकाणी वाघ आढळला त्या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहे. काही वेळाने वाघ पुन्हा थोड्या दूर जाऊन बसला. ड्रोन कॅमेऱ्याने वाघाचा शोध घेतला असता, त्यातही वाघ जलाशय परिसरात आढळला. सायंकाळी ७ वाजेपर्यंत नागरिक या परिसरात ठाण मांडून वाघाच्या हालचाली टिपत होते.
वणी परिसरात सध्या वाघाचे सातत्याने दर्शन होत आहे. दोन दिवसांपूर्वी वेकोली पैनगंगा कोळसा खाणीच्या परिसरात वाघ दिसला होता. निंबाळा गावालगत दिसलेला वाघ आजारी असावा किंवा शिकार न मिळाल्याने तो भुकेने व्याकूळ झाला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जलाशय आणि जवळच्या परिसरात येरझारा घालून तो विश्रांती घेत आहे. त्याला व्यवस्थित चालताही येत नसल्याचे प्रत्यक्ष बघणाऱ्या नागरिकांनी सांगितले. वाघाच्या हालचालीवर गावकरी वन विभागाच्या मदतीने लक्ष ठेवून असल्याचे लक्ष ग्रामपंचायत सदस्य मनोज ढेंगळे यांनी सांगितले.
वणी लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. तर लगतच्या पांढरकवडा तालुक्यात टिपेश्वर अभयारण्य आहे. त्यामुळे या परिसरात वाघांची भ्रमंती वाढल्याचे सांगितले जात आहे. टिपेश्वरचे क्षेत्रफळ कमी असून वाघांचा अधिवास अधिक आहे. त्यामुळे येथूनही वाघ इतरत्र स्थलांतरित होत असल्याचे सांगण्यात येते.
शोधमोहीम सुरू आहे
निंबाळा येथे वाघ दिसला. तो सध्या त्याच परिसरात असून वन विभागाकडून शोधमोहीम सुरू आहे. आज वर्धा येथूनही चमू आली आहे, अशी माहिती वणी येथील आरएफओ संगीता कोकणे यांनी दिली.