लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रपूर : सिंगापूरच्या धर्तीवर चंद्रपुरात ‘टायगर सफारी’ सुरू करण्यात येणार आहे. यात पर्यटकांना ऑस्ट्रेलिया व न्युझीलंडचे प्राणी पाहायला मिळतील. चंद्रपुरात मूल मार्गावर सुरू होणाऱ्या या ‘टायगर सफारी’साठी प्राथमिक अभ्यास करण्याकरिता वनविभागाचे १५ अधिकारी नुकतेच सिंगापूर व दुबई दौऱ्यावर जाऊन आलेत. या दौऱ्यात अधिकाऱ्यांनी प्राणिसंग्रहालय, पक्षी अभयारण्य, रात्र सफारी व शारजा सफारीचा अभ्यास केला.

अधिकाऱ्यांचे हे पथक लवकरच राज्य सरकारला याबाबत सविस्तर अहवाल सादर करणार आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर-मूल मार्गावरील वन अकादमी लगतच्या मोकळ्या जागेत ‘टायगर सफारी’ सुरू करण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. १५० ते २०० कोटींचा हा प्रकल्प आहे. या सफरीत पर्यटक पिंजऱ्यात तर त्यांच्या आजूबाजूला मोकळ्या वातावरणात वन्यजीव राहतील, असे नियोजन आहे. मार्च महिन्यात चंद्रपुरात झालेल्या ताडोबा महोत्सवात वनमंत्री मुनगंटीवार यांनी याबाबतची घोषणा केली होती.

आणखी वाचा-ताडोबात जूनाबाई वाघिणीची दोन पिल्लांसोबत मौजमस्ती, व्हिडिओ समाज माध्यमावर सार्वत्रिक

या पार्श्वभूमीवर १३ ते १७ मे या कालावधीत सिंगापूर दौऱ्यावर गेलेल्या अधिकाऱ्यांच्या पथकामध्ये वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, वनमंत्रालय आणि महसूल विभागाचे मुख्य वनसंरक्षक रविकिरण गोवेकर, वनविकास महामंडळ गोरेवाडा प्राणिसंग्रहालय लि., नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखरन बाला, गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय वन अधिकारी शतानिक भागवत, क्युरेटर दीपक सावंत आणि चांदा वनपरिक्षेत्राच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांचा समावेश होता.

२६ मे ते २ जून या कालावधीत दुबई दौऱ्यावर गेलेल्या पथकामध्ये वन विभागाचे उपसचिव विवेक होशिंग, मंत्रालयातील विशेष कर्तव्य अधिकारी सिद्धेश सावदेकर, मुख्य महाव्यवस्थापक संजीव गौर, एफडीसीएम (नियोजन), सुमित कुमार, गोरेवाडा प्राणिसंग्रहालय लि., नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखरन बाला, गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय वन अधिकारी भागवत, गोरेवाड्याचे प्रकल्प व्यवस्थापक अर्जुन त्यागी आणि चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांचा समावेश होता. या पथकाने शारजा सफारीला भेट दिली आणि इतरही माहिती जाणून घेतली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tiger safari in chandrapur like singapore visit of 15 senior officers of forest department to singapore and dubai rsj 74 mrj