चंद्रपूर : उत्तर ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रात आतापर्यंत चार जणांचे बळी घेणाऱ्या एसएएम – II या वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. जिल्ह्यात वन्यजीव आणि मानव संघर्षात मोठी वाढ झाली आहे. दर एक-दोन दिवसात वाघाच्या हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा जीव जात आहे. ब्रम्हपुरी परिसरातील जंगलात वाघांच्या हल्ल्यात मनुष्यहानीच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. गेल्या २८ जून, १६ ऑगस्ट, १७ ऑगस्ट व ४ नोव्हेंबर रोजी एसएएम- II या वाघाने चार जणांचे बळी घेतले. तेव्हापासून या वाघावर वनविभागाने लक्ष केंद्रित करण्यात आले.
हेही वाचा >>> नागपूर : शहराच्या गौरव गीताचा महापालिका प्रशासनाला विसर
‘कॅमेरा ट्रॅप’मध्ये टिपलेल्या छायाचित्रांनुसार चार जणांचे बळी घेणारा वाघ एसएएम-II हाच असल्याचे निष्पन्न झाले होते. एसएएम- II वाघाचा ब्रम्हपुरी उपक्षेत्रातील शेतशिवारात नियमीत वावर असल्याने व मानवी जीवितास धोका कायम असल्याने त्यास जेरबंद करण्याची कार्यवाही सुरु होती. मंगळवार, ८ नोव्हेंबर रोजी एसएएम- II वाघास ब्रम्हपुरी उपक्षेत्रातील कक्ष क्रमांक ११८ मध्ये सायंकाळच्या सुमारास डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी ‘डार्ट’ करुन बेशुद्ध केले. यानंतर वनविभागाने वाघाला पिंजऱ्यात जेरबंद केले. यावेळी वन विभागाचे संपूर्ण पथक उपस्थित होते.