चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील महालगाव शेतशिवारात वीजप्रवाह सोडून वाघाची हत्या करण्यात आली. याप्रकरणात वनविभागाने आरोपीचे वाघाच्या रक्ताने माखलेले कपडे जप्त केले आहे. वाघाच्या मिशा, सतरा नखे आणि चार दातही ताब्यात घेतले आहे. याप्रकरणात आणखी एक आरोपी पसार असून, वनविभाग त्याच्या मागावर आहे.
वरोरा तालुक्यातील माहलगाव शेतशिवारातील शेताच्या कुंपणाला विद्युत प्रवाह सोडून वाघाची शिकार करण्यात आली. त्यानंतर वाघाचे कुऱ्हाडीने चौदा तुकडे करून पोत्यात भरून वर्धा जिल्ह्याच्या शिवारात फेकून दिले. अवघ्या काही तासांत वाघाच्या अवयवांची विल्हेवाट लावताना आणि तुकडे व वाहतूक करताना आरोपीचे शर्ट-पॅन्ट रक्ताने माखले होते काय, त्याची शहानिशा वन विभागानी केली. रक्ताने माखलेले कपडे वनविभागाने जप्त केले आहे.
वाघाचे तुकडे केल्यानंतर आरोपीने महालगाव शिवारातील शेतातील झोपडीमध्ये १७ नखे आणि जमिनीत पुरलेले चार दात ताब्यात घेतले. वाघाचे तुकडे पोत्यात भरून वर्धा जिल्ह्याच्या शिवारात वाहतूक करताना रक्ताने माखलेले कपडे आरोपी अविनाश भारत सोयाम याने पवनगाव शेत शिवारातील शेततळ्याच्या झुडपात लपवून ठेवले होते. आरोपीने ती जागा वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दाखविली. चंद्रपूर, वर्धा वनविभागाने संयुक्त कारवाई करत वाघाच्या हत्येप्रकरणी भक्कम पुरावे गोळ्या केले आहे. या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे. त्याच्या मागावर वनविभाग असून यामध्ये आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही कारवाई चंद्रपूर विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, चंद्रपूर सहायक वनसंरक्षक वनिता चौरे, वर्धा सहायक वनसंरक्षक अमरजित पवार यांच्या मार्गदर्शनात वरोरा वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड, समुद्रपूर वनपरिक्षेत्र अधिकारी बारेकर, टेमुर्डा क्षेत्र सहाय्यक चांभारे, वनरक्षक केतकर नेवारे, वेदांती करीत आहे.