नागपूर : भारतातील वाघांच्या अधिवासातील मानव-वन्यजीव संघर्षाचे आव्हान वाढत असतानाच आता कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कॅमेरा अलर्ट तंत्रज्ञान तयार करण्यात आले आहे.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, ग्लोबल टायगर फोरम, रिझॉल्व्ह ही स्वयंसेवी संस्था आणि क्लेमसन युनिव्हर्सिटीने ‘ट्रेलगार्ड एआय’ या नावाने ओळखले जाणारे हे तंत्रज्ञान तयार केले आहे. यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष टाळता येणे साेपे होणार आहे.

हेही वाचा – बुलढाणा : ‘फोटो स्टुडिओ’ आगीच्या भक्ष्यस्थानी; ६ लाखांची हानी

भारतातील वाघांची संख्या वेगाने वाढत आहे. इतरही वन्यप्राण्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे हे वन्यप्राणी संरक्षित क्षेत्राबाहेर जायला लागले आहेत. २०२२च्या व्याघ्रगणनेनुसार, भारतात तीन हजार ६८२ वाघ आहेत. जगभरातील वाघांपैकी ७५ टक्के वाघ भारतात आहेत. यातील २६ टक्के वाघ संरक्षित क्षेत्राबाहेर म्हणजेच संरक्षित क्षेत्राच्या सीमेवर आणि बफर क्षेत्रात आढळतात. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षावर अजूनही आळा घालता आलेला नाही. या संघर्षात माणसे, पाळीव जनावरे जखमी होतात, मृत्युमुखी पडतात. त्यामुळे गावकरी वाघांना मारण्यासाठी विषप्रयोग, वीजप्रवाह यासारख्या गोष्टींचा वापर करतात. हा संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीनेच नवीन तंत्रज्ञानाने युक्त अशी व्यवस्था तयार करण्यात आली आहे.

उत्तर भारतातील कान्हा-पेंच आणि तेराई-आर्क या सर्वाधिक वाघ असणाऱ्या लँडस्केपमध्ये आणि जवळपास पाच व्याघ्रप्रकल्पांमध्ये मे २०२२ पासून ‘ट्रेलगार्ड एआय’ वापरण्यात येत आहे. भारतात या प्रणालीची चाचणी घेण्यापूर्वी हे नवीन तंत्रज्ञान दक्षिण आफ्रिकेत प्रभावीपणे वापरण्यात आले. सुरुवातीला हे तंत्रज्ञान जंगलातील वन्यप्राण्यांच्या शिकाऱ्यांचा मागोवा घेण्यासाठी तयार करण्यात आले होते. मात्र, त्यात आणखी संशोधन केल्यानंतर हत्ती, गेंडा, अस्वल, रानडुक्कर यासारखे सर्व प्राणी तसेच पक्ष्यांच्या प्रतिमादेखील यात टिपल्या जातात, हे स्पष्ट झाले. हे तंत्रज्ञान वाघांचा अधिवास असणाऱ्या राज्यांमध्ये उपयुक्त ठरू शकते.

हेही वाचा – चंद्रपूर : विजेच्या धक्क्याने दोन शेतकरी ठार

वन्यजीव संरक्षणासाठीदेखील ते उपयुक्त ठरू शकते. एवढेच नाही तर २४ बाय ७ ते काम करत असल्याने वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी फिरणाऱ्या वनकर्मचाऱ्यांना ज्या मर्यादा येतात, त्याही याद्वारे टाळल्या जाऊ शकतात.

३० सेकंदात छायाचित्र मोबाईलवर

या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वन्यप्राण्याचे छायाचित्र टिपून संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत ते छायाचित्र पोहोचवण्याची प्रक्रिया अवघ्या ३० सेकंदात पार पाडली जाते. या कॅमेऱ्यातील बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर अडीच हजारांहून अधिक प्रतिमा त्यातून टिपल्या जाऊ शकतात. या नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जंगलालगतच्या गावांजवळील बफर क्षेत्रात असणाऱ्या वाघांचे निरीक्षण करता येणे सोपे झाले आहे. वाघच नाही तर इतरही वन्यप्राण्यांच्या प्रतिमा टिपल्या जाऊ शकतात. भारतात उत्पादित ‘ट्रेलगार्ड एआय’ हे सुलभ, परवडणारे आणि स्थापित करण्यास सोपे आहे. धोक्यात असलेल्या प्रजातीचे संरक्षण करण्यासाठी आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी ते उपयुक्त ठरू शकते.

Story img Loader