नागपूर : भारतात वाघांची संख्या वाढल्याचे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने जाहीर केल्यानंतर देशभरात जणू व्याघ्रउत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात न्हाऊन जाताना वाढलेल्या वाघांच्या संरक्षणाचा कुणीच विचार केला नाही. ज्या मध्यप्रदेशात वाघांची सर्वाधिक संख्या वाढली, त्याच मध्यप्रदेशात आता वाघांच्या मृत्यूची आकडेवारी देखील वाढत आहे. रातापाणी वन्यजीव अभयारण्याजवळील सिहोर जिल्ह्यातील बुधनी रेल्वे ट्रॅक परिसरात वाघाचा एक बछडा मृत पावला तर दोन वाघ जखमी झाले. मध्यप्रदेशात गेल्या सहा महिन्यातील वाघाचा हा २३वा बळी आहे. मध्यप्रदेशातील नवीन व्याघ्रप्रकल्प जेथे होणार आहे, त्या रातापाणी वन्यजीव अभयारण्याचा हा भाग आहे.
हेही वाचा >>> पालकमंत्री बेपत्ता! थेट पोलीस ठाण्यात तक्रार; कुठे घडला हा प्रकार? वाचा…
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने २०११ मध्ये रातापाणीला व्याघ्र प्रकल्प बनवण्याचा प्रस्ताव ठेवला होता आणि आता त्याला मध्यप्रदेश सरकारने मान्यता दिली आहे. रेल्वे अपघातांमुळे अनेक प्राणी मृत्युमुखी पडत आहेत आणि हे थांबवण्यासाठी केंद्र सरकारने वनक्षेत्रातून जाणाऱ्या रेल्वे रुळांवर कुंपण बांधण्याचा निर्णय घेतला परंतु हे काम अद्याप सुरू झालेले नाही. मृत वाघाला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून भोपाळ येथील तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी दोन जखमी वाघांवर उपचार करत आहेत. नव्याने तयार झालेल्या व्याघ्र प्रकल्पातील या राष्ट्रीय प्राण्यांच्या मृत्यूनंतर सरकार कुंपण घालण्याचे काम सुरू करेल का, अशीही आता विचारणा होत आहे. एका तज्ज्ञ गटाने मध्य प्रदेश सरकारला याठिकाणी कुंपण घालण्याबरोबरच दीड डझन ‘ओव्हरब्रिज’ आणि ‘अंडरपास’ बांधण्याचा सल्ला दिला होता.
हेही वाचा >>> आषाढी एकादशीला उपवास करताय.. मग हे कराच..
“मॅजेस्टिकचा सुसाईड पॉईंट” म्हणून हा ट्रॅक आता ओळखला जात आहे. रतापाणी अभयारण्यातून पाणी पिण्यासाठी घरडिया नाल्याजवळ जाण्यासाठी वाघ या मार्गाचा वापर करतात आणि त्यांचा हा कॉरिडॉर आहे. ‘वाइल्डलाइफ कॉन्झर्व्हेशन ट्रस्ट’ला रेल्वेच्या धडकेत वाघांच्या वारंवार होणाऱ्या मृत्यूंमागील कारणे शोधण्याचे काम सोपवण्यात आले होते आणि त्यांनी प्रकल्प अहवाल पूर्ण केला होता. सीहोर जिल्ह्यातील इटारसी-बैतुल रेल्वे मार्गाच्या १२ किमी लांबीच्या बुधनी ट्रॅकचा परिसर संवेदनशील ठिकाण आहे. या परिसरात वीसपेक्षा अधिक वाघ आहेत. १२ किलोमीटर लांबीचा इटारसी-बैतुल रेल्वे मार्ग, दोन ट्रॅकसह या प्रदेशातील सर्वात व्यस्त रेल्वे वाहतुकीपैकी एक मानला जातो. या मार्गावर आजच नाही तर यापूर्वी देखील अनेक वाघांचा बळी गेला आहे. एवढेच नाही तर या रेल्वे ट्रॅकवर अनेक वन्यप्राणी मृत्युमुखी पडले आहेत. ही स्थिती सगळीकडेच असली तरीही मध्यप्रदेशातील वाघांचे वाढते मृत्यू चिंतेचे कारण ठरत आहे.