नागपूर : राज्यातील वाघांना पुन्हा बहेलिया शिकाऱ्यांचा धोका निर्माण झाला आहे. जळगावातील मुक्ताई-भवानी संवर्धन राखीवला लागून असलेल्या वडोदा वनक्षेत्रात वाघाच्या कातडीसह आरोपींना अटक करण्यात आली. बहेलिया वाघाच्या शिकारीनंतर ज्या पद्धतीने वाघाची कातडी काढतात, तशीच अतिशय सफाईदारपणे ही कातडी काढण्यात आली.

हा वाघ विदर्भाच्या जंगलातील असण्याचीही दाट शक्यता आहे. पुणे व जळगाव सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारावर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर ही कारवाई केली. यात वाघाच्या कातडीसह सहा आरोपींना अटक करण्यात आली. मात्र, तब्बल २४ तास हे प्रकरण वनखात्याच्या अधिकाऱ्यांना न सोपवता सीमाशुल्क विभागानेच हाताळले. त्यानंतर वनखात्याकडे सूत्रे सोपवण्यात आली. वाघाची मध्यप्रदेशात शिकार केल्याचा अंदाज जळगाव वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मात्र, एकूण प्रकार पाहता ही शिकार विदर्भातील वाघाचीच असण्याची दाट शक्यता वनखात्याच्याच अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – श्याम मानव यांनी राजकीय भाष्य केले असेल तर गैर काय – बच्चू कडू

विदर्भात दरवर्षी किमान ४० ते ५० वाघाचे बछडे जन्माला येतात. त्यानुसार दहा वर्षात ५०० नवीन वाघ जंगलात दिसतात. मात्र, व्याघ्रगणनेत विदर्भातील वाघांची संख्या ४५० च्या आतच आहे.

वाघाच्या जन्माचे एकूणच समीकरण लक्षात घेता विदर्भात वाघाची शिकार होत असल्याचे स्पष्ट मत वन्यजीव विभागातील एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने व्यक्त केले.

हेही वाचा – वर्धा : थरारक! वाघाडी नदीला पूर, तरीही पुलावरून ट्रक नेला; नंतर जे घडले ते…

बहेलिया ही वाघाची शिकार करणारी जमात आणि त्याच्या अवयवांची विक्री करणारी बावरिया जमात याबाबत केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेने वारंवार वनखात्याला सतर्कतेचा इशारा दिला. २०१३ ते १६ या कालावधीत बहेलिया शिकाऱ्यांनी विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ सुमारे ४० ते ५० वाघांची शिकार केली. त्यांच्या तस्करीची जबाबदारी बावरिया यांनी पार पाडली. या प्रकरणात तब्बल १५० बहेलिया शिकाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर हे शिकारसत्र थांबले असे वाटत असतानाच एक ते दीड वर्षांपूर्वी महाराष्ट्रात २० शिकाऱ्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात देखील अनेक वाघांची शिकार झाल्याचे समोर आले.