नागपूर : जंगलात वाघांना पाहणे ही सुखद अनुभूती आणि विदर्भातील जंगलातील वाघ पर्यटकांना कधीच निराश करत नाही. त्यातही ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर बघायला मिळतात. आता तर महाराष्ट्रातील पेंच व्याघ्रप्रकल्पातील वाघांचेही अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. असाच एक व्हिडिओ रुद्रा सावजी यांनी पेंच व्याघ्रप्रकल्पात टिपला आहे. ते बघून हेच शब्द तोंडातून बाहेर पडतात, ” उफ ! तेरी अदा !”
अलीकडेच मध्यप्रदेशातील एका वाघिणीचा व्हिडिओ समोर आला, ज्यात ती वाघीण तिचे सावज पाठलाग करून अचूकपणे हेरते आणि त्याला गाठते. आता महाराष्ट्रातील पेंच व्याघ्रप्रकल्पातीळ वाघिणीचाही असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात ही वाघीण शिकार केलेल्या सांबरवर ताव मारत असते. मात्र, जेव्हा पर्यटकांची वाहने तिला पाहतात, तेव्हा केलेल्या शिकारीवर ताव मारणे ती थांबवते आणि पर्यटकांना मनसोक्त दर्शन देते. एखाद्या अभिनेत्रीला देखील लाजवेल असेच तिचे हावभाव आहेत. तिच्या या अदा टिपताना छायाचित्रकारांचे कॅमेरे थकतात, पण ती मात्र थकत नाही. काही वेळानंतर तीच वाघीण पुन्हा ती केलेल्या शिकारीकडे वळते. मात्र, या दरम्यान त्या वाघिणीच्या अदा पाहण्यासारख्याच होत्या.
देशाच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या नागपूर शहराच्या परिघात ज्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे त्याप्रमाणे अनेक व्याघ्र प्रकल्प देखील आहेत. त्यामुळं वर्षाकाठी लाखो पर्यटक या व्याघ्र प्रकल्पांना भेट देत असून दिवसेंदिवस भेट देणाऱ्या या पर्यटकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. ताडोबा, मेळघाट, कान्हा, पेंच इत्यादी सारख्या प्रख्यात व्याघ्र प्रकल्प म्हणजे वन्यजीव प्रेमींसाठी व्याघ्र दर्शनाचे नंदनवनच आहे. मात्र, संपर्ण जगात भेडसावणारी प्रदूषणाची समस्या आता जंगल आणि व्याघ्र प्रकल्पांना देखील निर्माण झाली आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्प हा देशातील २५वा व्याघ्र प्रकल्प म्हणून २३ फेब्रुवारी १९९९ रोजी घोषित करण्यात आला. पूर्व विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक, पारशिवनी आणि सावनेर तालुक्यांत आहे. ७४१.४१ चौरस किलोमीटर याचे क्षेत्र आहे. कोअर झोन २७५ चौरस किलोमीटरचा, तर बफर झोन सुमारे ४८३ चौरस किलोमीटरचा आहे. या प्रकल्पाला सिल्लारी, चोरबाहुली, खुर्सापार, कोलितमारा, खुबाळा आणि सुरेवानी अशी सहा प्रवेशद्वारे आहेत. तत्पूर्वी १९७५ साली पेंच हे राष्ट्रीय उद्यान जाहीर करण्यात आले.