नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील ‘छोटी तारा’ ही वाघीण म्हणजे या जंगलाची तारका. तिचे बछडेही तिच्यासारखेच.पर्यटकांना सहज दर्शन द्यायची जी सवय ‘छोटी तारा’ला होती, तीच तिच्या बछड्यांना देखील. कधी आईसोबत तर कधी आईच्या जवळपास पण वेगळीवेगळी. ताडोबाच्या गाभा क्षेत्रात अलीकडेच तिचे दोन्ही बछडे ऐन पर्यटनाच्या रस्त्यावर दंगामस्ती करताना आढळून आले. वन्यजीवप्रेमी आणि छायाचित्रकार अर्थ तिडके याने हा क्षण त्यांच्या कॅमेऱ्यात साठवला. 

हेही वाचा >>> “…तर विधानसभा निवडणुकीनंतर नोकरी, शिक्षणातील आरक्षण संपेल,” ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

पावसाळ्यातील सुटीनंतर जंगलातील पर्यटनाचा हंगाम आता कुठे सुरू झाला आहे आणि पर्यटकांनी पहिली धाव घेतली आहे ती ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाकडे. कारण या जंगलातील वाघ मग ते बफर क्षेत्रातील असोत वा गाभा क्षेत्रातील, पर्यटकांना ते कधीच निराश करत नाहीत. येथील वाघांच्या, त्यांच्या बछड्यांच्या कितीतरी कथा या व्याघ्रप्रकल्पातच लिहिण्यात आल्या आहेत.

‘छोटी तारा’ ही वाघीण त्यातलीच एक. ताडोबाच्या जंगलात पहिल्यांदा जर कोणत्या वाघिणीला रेडिओ कॉलर लावण्यात आले असेल तर ती ‘छोटी तारा’ला. २०१४च्या सुमारास तिला रेडिओ कॉलर करण्यात आले. २०२० मध्ये नंतर ही कॉलर काढण्यात आली. ताडोबातील मोहर्लीचे वनक्षेत्र हा तिचा मुळ अधिवास. खरं तर ती आता उतारवयाकडे झुकली आहे, पण तिला पाहिल्यानंतर ते दिसून येत नाही. तिचा बिनधास्तपणा आजही तसाच कायम आहे. तोच गुण तिच्या बछड्यांमध्ये देखील दिसून येतो. ‘छोटी तारा’ असोत वा तिचे बछडे, ते अगदी सहजपणे पर्यटकांना सामोरे जातात.

हेही वाचा >>> बाप नव्हे राक्षसच… पत्नी बाहेर जाताच करायचा मुलीवर बलात्कार

कदाचित त्यामुळेच ते अधिक प्रसिद्ध असावेत. अलीकडे तर तिचे बछडे देखील तिचीच ‘री’ ओढायला लागले आहेत. आतापर्यंत ‘छोटी तारा’ने सहावेळा बछड्यांना जन्म दिला आहे. आता सध्या तिच्यासोबत दिसून येणारे आणि प्रचंड मस्तीखोर दिसणारे तिचे बछडे म्हणजे तिच्या पोटी जन्माला येणारे शेवटचेच. छोटी ताराचे तिच्या या बछड्यांसोबतच्या अनेक ध्वनीचित्रफिती आणि छायाचित्र अलिकडे समाजमाध्यमावर येत आहेत. पर्यटकांनी भरलेली वाहने असताना देखील ‘छोटी तारा’ बिनधास्तपणे तिच्या बछड्यांसोबत रस्त्यावरुन जाताना दिसून येत आहे. यात त्यांचा रुबाबदारपणाही तेवढाच दिसून येतो. अलीकडेच मोहर्लीच्या गाभा क्षेत्रात तिच्या दोन्ही बछड्यांनी पर्यटकांची चांगलीच करमणूक केली. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे सगळीकडे हिरवळ पसरली आहे. दोन्ही बाजूला हिरवळीचे रान असताना ‘छोटी तारा’चे दोन्ही बछडे दंगामस्ती करत आहेत. सुरुवातीला ते एकमेकांशी भांडत आहेत की काय असाच भास होत असताना, नंतर मात्र ते भांडत नाहीत तर दंगामस्ती करत असल्याचे दिसून आले.