चंद्रपूर : बल्लारपूर वनपरिक्षेत्रात वाघिणीपासून दुरावल्याने तिच्या तीन पिल्लांचा उपासमारीने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज, मंगळवारी सकाळी पोंभुर्णा तालुक्यांअंतर्गत येणाऱ्या फिस्कुटी गावातील शेतात अडीच वर्षांची वाघीण मृतावस्थेत आढळल्याने वनखात्यात खळबळ उडाली आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील फीस्कुटी येथील पपलू वामन शेंडे हे चंद्रपूर येथील रहिवासी असलेल्या जगदिश गावतुरे यांची शेती करतात. मंगळवारी सकाळी ७:३० वाजताचे सुमारास एक मजूर महिला निंदनासाठी त्यांच्या शेतात गेली असता त्यांना वाघीण मृतावस्थेत आढळली.
त्यांनी ही माहिती शेतमालकाला दिली. शेतमालकाने फिस्कुटीच्या सरपंचांमार्फत ही पोंभुर्णा वनपरिक्षेत्र अधिका-यांना कळवले. माहिती मिळताच वनाधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. वाघिणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समोर आले नाही. विशेष म्हणजे, ३१ जुलै रोजी भद्रावती तालुक्यातील एका गावात जिवंत वीज पुरवठा सोडून वाघाची शिकार करण्यात आली होती. या वाघिणीसोबतही तसाच प्रकार घडला तर नसावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे.