लोकसत्ता टीम
नागपूर : रानडुक्कर हे वाघांचे आवडते सावज आणि तेच हेरण्यासाठी वाघीण त्याच्या मागे धावली. जीव वाचवण्यासाठी धडपड करत असताना ते सावज विहिरीत पडले आणि त्यापाठोपाठ ती वाघीण देखील विहिरीत पडली. पण यावेळी ती वाघीण सावजाला हेरण्यासाठी नाही तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडत होती आणि ते सावज मात्र, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडत होते. शेवटी सावजाचाही जीव वाचला आणि वाघीणही सुखरूप विहिरीच्या बाहेर पडली. ही नाट्यमय घटना मध्यप्रदेशातील सिवनीजवळ घडली.
मध्यप्रदेशातील सिवनीजवळ एका वाघिणीने शिकारीसाठी रानडुकराचा पाठलाग केला. ते रानडुक्कर जीवाच्या आकांताने पळत होते आणि वाघिणीला तिचे सावज पकडायचे होते. बराच अंतरापर्यंत हा खेळ सुरू होता. जिवाच्या आकांताने धावणाऱ्या रानडुकराला समोर विहीर आहे हे देखील कळले नाही आणि तो विहीरीत पडला. तर त्यापाठोपाठ धावणारी वाघीण देखील विहिरीत पडली. ही माहिती मध्यप्रदेश वनखात्याला मिळताच मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्रप्रकल्पाची चमू घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. मात्र, सावज आणि शिकारी असे दोन्हीही एकाच ठिकाणी असल्याने त्यांना वाचवण्याचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. यावेळी विहीरीत पडलेले रानडुक्कर वाघिणीपासून आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत होते, पण त्याचवेळी वाघीण आपला स्वत:चा जीव वाचवण्यासाठी धडपडत होती.
विहीरीला असलेल्या लोखंडी सळ्यांना पकडूनही तिने वर चढण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण त्यात ती अयशस्वी ठरली. दरम्यान, मध्यप्रदेश वनखात्याच्या चमुने दोन बांधून एक खाट विहीरीत सोडली. तर त्यानंतर एक पिंजरा देखील त्या विहीरीत सोडला. सुरुवातीला वाघिणीच्या धाकाने ते रानडुकर पिंजऱ्याच्या आड लपण्याचा प्रयत्न करत होते. तर त्यानंतर ते त्या खाटेवर चढले. मात्र, पुन्हा ते पाण्यात उतरले. यानंतर ती वाघीण त्या खाटेवर चढली. त्याचवेळी बचावकार्य करणाऱ्या चमुने तो पिंजरा खाटेजवळ आणला. तर आतापर्यंत वाघिणीपासून दूर पळणारे रानडुक्कर देखील त्या वाघिणीला जणू पिंजऱ्यात जाण्यासाठी मदत करत होते, असे दिसून आले.
ती वाघीण पिंजऱ्यात जाताच चमुने पिंजऱ्याचे दार बंद केले आणि बचावकार्यातील चमुने पिंजरा वर खेचला. त्यानंतर त्या रानडुकराला देखील पाण्यातून बाहेर काढण्यात आले. स्थानिक आणि वन अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू केल्यामुळे या दोघांचाही जीव वाचला. रानडुकराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. तर वाघिणीला देखील नौरादेही अभयारण्यात सोडण्यात आले.