नागपूर : महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून कृत्रिम स्थलांतर घडवून आणलेली वाघीण सोमवारी सकाळी ओडिशातील सिमिलीपाल व्याघ्रप्रकल्पात स्थिरावली. सोमवारी सकाळी महाराष्ट्रातून आणलेल्या या वाघिणीला ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील सिमिलीपाल व्याघ्रप्रकल्पाच्या मुख्य भागात तयार करण्यात आलेल्या सुमारे दोन हेक्टरच्या खुल्या पिंजऱ्यात सकाळी ९.२५ वाजता या वाघिणीला सुरक्षितपणे सोडण्यात आले. साधारणपणे नवीन क्षेत्रात आल्यानंतर वाघ किंवा वाघीण यांच्या हालचाली मंदावतात. त्या क्षेत्राची ओळख होईपर्यंत ते नवीन ठिकाणी स्वत:ला जुळवून घेत नाहीत. मात्र, ताडोबातील या वाघिणीने लगेच या क्षेत्राशी जुळवून घेतल्याचे तिच्या एकूणच वर्तणुकीवरुन दिसून आले.

हेही वाचा >>> ‘लाडक्या भावां’ची दिवाळी अंधारातच

ही वाघीण सक्रिय आणि निरोगी असल्याचे सिमिलीपाल व्याघ्रप्रकल्पाचे क्षंत्र संचालक प्रकाश चंद्र गोगिनेनी यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या अडीच वर्षाच्या वाघिणीला शनिवारी सकाळी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून जेरबंद करण्यात आले. यावेळी ओडिशाच्या सिमिलीपाल व्याघ्रप्रकल्प व महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या चमुने एकत्रितपणे ही मोहीम यशस्वी केली.

शनिवारी सकाळी या वाघिणीला बेशुद्ध करुन जेरबंद करण्यात आल्यानंतर तिची तपासणी करण्यात आली व लगेच रवाना करण्यात आले. सिमिलीपाल येथे रविवारी दुपारी आणण्यात आले. सिमिलिपाल दक्षिण विभागातील मुख्य भागात खुला पिंजरा तयार करण्यात आला आहे. वन्यप्राण्याला जंगलात सोडण्यापूर्वी किमान एक ते दोन आठवडे या खुल्या पिंजऱ्यात निरीक्षणात ठेवले जाईल. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या परवानगीने वाघिणीचे स्थलांतर करण्यात आले.

हेही वाचा >>> विमानांना धमक्यांचे धागेदोरे गोंदियापर्यंत? अनेकांना ईमेल करणाऱ्या आरोपीचा शोध सुरू

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील दोन वाघिणी सिमिलीपाल व्याघ्रप्रकल्पात सोडण्यात येतील आणि त्यापैकी एक आधीच येथे पोहोचली आहे. वाघांचे स्थलांतर करण्याचा ओडिशाचा हा दुसरा प्रयत्न होता. २०१८ साली ओडिशा सरकारने सातकोसिया व्याघ्र प्रकल्पात वाघांचे स्थानांतर करण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामध्ये आता वाघ नाहीत. त्यावेळी ‘महावीर’ नावाच्या वाघाला कान्हा राष्ट्रीय उद्यानातून आणि ‘सुंदरी’ नावाच्या वाघिणीला मध्य प्रदेशातील बांधवगड राष्ट्रीय उद्यानातून आणून सातकोसियामध्ये सोडण्यात आले. मात्र, शिकाऱ्यांनी लावलेल्या सापळ्यात पडून वाघाचा मृत्यू झाला, तर ओडिशामध्ये अडीच वर्षाच्या वास्तव्यादरम्यान दोन जणांना ठार मारल्यानंतर या वाघिणीला तिच्या मूळ अधिवासात परत पाठवण्यात आले. सिमिलिपालमध्ये वाघिणीच्या आगमनाने राज्यातील वाघांची संख्या ३१ वर पोहोचली आहे, त्यापैकी २८ वाघ सिमिलीपाल व्याघ्रप्रकल्पात आहेत. या व्याघ्रप्रकल्पात ‘मेलेनिस्टिक’ वाघांची देखील  संख्या मोठी  आहे.