नागपूर : वाघ बघायचा तर उन्हाळ्यातच ते दिसणार! अलीकडच्या काही वर्षांपर्यंत तरी हाच समज होता. कारण, व्याघ्रदर्शन व्हायचे ते याच काळात. पाणी पिण्यासाठी बाहेर पडणारा वाघ दिसायचाच! क्वचितच ते हिवाळा आणि पावसाळ्यात दिसायचे. आता मात्र तसे नाही. ताडोबातील वाघ तुम्हाला बारमाही दर्शन देतात आणि त्यामुळेच उन्हाळ्याव्यतिरिक्त इतरही ऋतूत पर्यटकांची संख्या वाढायला लागली आहे. वाघिणीचे सहकुटुंब दर्शन म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच.

ताडोबातील “के मार्क” या नावाने प्रसिद्ध असलेल्या वाघिणीने तिच्या तीन बछड्यासह पर्यटनाच्या रस्त्यातच ठाण मांडले. पण तिने पर्यटकांचा रस्ता अडवला असला तरीही पर्यटक मात्र खुश झाले. या वाघिणीच्या कुटुंबकबिल्याची अतिशय सुंदर अशी चित्रफीत वन्यजीव छायाचित्रकार अरविंद बंडा यांनी तयार केली. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ‘के-मार्क’ या वाघिणीला न ओळखणारे असे नाहीतच. ताडोबात ती पर्यटकांमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. तिच्या बछड्यांसह फिरताना नेहमीच दिसून येते. ताडोबातील वाघीण ‘माधुरी’ आणि ‘खली’ या वाघाची मुलगी म्हणजे ‘के-मार्क’. आता तीसुद्धा तीन बछड्यांची आई झाली असून बछड्यांसह फिरताना पर्यटकांना दिसून येत आहे. ताडोबाच्या केसलाघाट पर्वतरांगाभोवती तिचे अस्तित्व असते. या धाडसी आणि सुंदर वाघिणीने दक्षिण ताडोबाच्या केसलाघाट आणि झरीपेठच्या जंगलावर आपले साम्राज्य स्थापित केले आहे.

हेही वाचा…हिंदुत्ववादी मतविभाजनासाठी शिवसेनेचा (ठाकरे गट) रडीचा डाव, भाजप आमदार सावरकरांचा आरोप

‘के मार्क’ ही वाघीण अतिशय जोखमीच्या भागात राहते. तिला हिवाळ्यात अनेक वेळा राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना पाहिले आहे. उन्हाळ्यातील तिच्या या पाणवठ्यातील व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. तर आता ही वाघीण आणि तिच्या तीन बछड्यांनी ताडोबा – अंधारी व्याघ्रप्रकल्पातील झरीपेठ बफर झोनमध्ये चक्क पर्यटनाच्या रस्त्यातच ठाण मांडले. “के मार्क” वाघिणीचे तिन्ही बछडे बऱ्यापैकी मोठे झाले असले तरी आईसोबत असतांना ते लहानासारखेच वागतात. पर्यटनाच्या रस्त्यात चक्क या तिघांनीही त्यांच्या आईसह बस्तान मांडले. नंतर काय झाले कुणास ठाऊक. त्या तिघांपैकी एक उठला आणि पर्यटक वाहनाच्या दिशेने येऊ लागला. जणू तो हेच सांगत होता की, “तुम्ही पैसे देऊन आम्हाला बघायला आला असलात, तरीही हे जंगल आमचा अधिवास आहे आणि आम्ही येथे कुठेही ठाण मांडून बसणार”. पर्यटकांनी देखील त्यांचा हा हक्क मान्य करत तेथून काढता पाय घेतला. आणि मग पुन्हा एकदा “के मार्क” ही वाघीण आणि तिच्या बछड्यानी भर रस्त्यातच आराम केला.