लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : जंगलालगतचे महामार्ग, रेल्वे महामार्ग वन्यप्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. तीन महिन्यांपूर्वी बल्लारशा-गोंदिया रेल्वे मार्गावर रेल्वेच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी पहाटेच्या सुमारास भंडारा वनखात्यांतर्गत रेल्वेच्या धडकेने वाघीण गंभीर जखमी झाली. या धडकेत वाघीणीची शेपटी तुटली तर पायाला देखील गंभीर मार लागला. त्यामुळे या वाघीणीच्या नशिबी कायमचे अपंगत्व येण्याची दाट शक्यता आहे.

रेल्वे आणि वन्यप्राणी समोरासमोर येणे हे नित्याचेच. कधी यात ते मृत्युमुखी पडले, तर कधी कायमचे अपंग झाले. सूर्यास्त होत असताना जंगलातील वन्यप्राण्यांच्या हालचालीचा वेग वाढतो आणि सुर्याोदय होत असताना त्यांची जंगलातील हालचाल मंदावते. त्यामुळे जंगलालगतचे रेल्वेमार्ग, रस्ते, महामार्ग यावरुन होणाऱ्या वाहतूकीचा वेग हा या कालावधीत कमी असणे अपेक्षित असताना ते कधीच होत नाही. जंगलातून जाणाऱ्या आणि जंगलालगतच्या या रस्ते आणि रेल्वेमार्गांसाठी गतीमर्यादा ठरवून देण्यात आली आहे. मात्र, त्याचेही पालन होत नाही. त्यामुळे आपल्याच अधिवासात वन्यप्राण्यांना मृत्यूला सामोरे जावे लागते. “मॅटिगेशन मेजर्स” कडे होणारे दुर्लक्ष वन्यप्राण्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरत आहे. याकडे गांभीर्याने न पाहिल्यामुळे रेल्वेच्या धडकेत ठार होणाऱ्या वाघ आणि बिबट्यांची संख्याही वाढत आहे.

आणखी वाचा-निवडणुकीच्या तोंडावर ऑटोरिक्षाचे चाके थांबणार? संयुक्त कृती समिती म्हणते…

भंडारा वनविभागांतर्गत नाकाडोंगरी वनक्षेत्रात पवनार खारी परिसरात ही घटना घडली. विशेष म्हणजे याच परिसरात काळ्या बिबट्याचा देखील वावर आहे. तुमसर ते तिरोडी जाणारा या रेल्वे मार्गावर शुक्रवारी सकाळी सकाळी हा अपघात घडला. या अपघातात वाघीणीची शेपटी कटली, तर पायाला देखील गंभीर मार लागला. त्यामुळे वाघीणीला जागेवरून उठता येणेही अशक्य होते. गंभीर मार बसल्यामुळे वाघीण वेदनेने विव्हळत होती. या घटनेची माहिती कळताच भंडारा वनविभागाची चमू तसेच मानद वन्यजीव रक्षक शाहीद खान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या वाघीणीला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात येत आहे.

आणखी वाचा-नागपूर : बंद वाहतूक सिग्नल; वाहनचालकांना मन:स्ताप, महापालिका-वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

उपचारासाठी त्याला नागपूर येथे आणण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यात रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारलेले आहे. अनेक रेल्वे मार्ग जंगलाला लागून तर काही जंगलाच्या हद्दीतून गेले आहेत. मात्र, त्यानंतरही याठिकाणी वन्यप्राण्यांचे रेल्वेने होणारे अपघाती मृत्यू टाळण्यासाठी शमन उपाय गांभीर्याने घेतले जात नाही. रेल्वेची गती या मार्गावर कमी होत नाही. वाघ, बिबट मृत्युमुखी पडले तर लक्षात तरी येते, पण कित्येक लहानमोठे वन्यप्राणी या रेलवे मार्गावर अपघाताला बळी जात आहेत. त्यानंतरही अलीकडच्या काही वर्षांत जंगलाला समांतर असणाऱ्या या रेशीय प्रकल्पांना मान्यता देण्याचे प्रमाण वाढले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tigress seriously injured in train collision while crossing road rgc 76 mrj