आपल्या चार पिल्लांसह गडचिरोली वनविभागाच्या चातगाव वनपरिक्षेत्रात वावरणाऱ्या ‘टी ६’ वाघिणीने दहावा बळी घेतला slआहे. काल याच वाघिणीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या आंबेटोला येथील मंगला कोपरे (५०) यांचा मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. या आक्रमक वाघिणीच्या बंदोबस्तासाठी वनविभाग पुन्हा सक्रिय झाले असून लवकरच तिला जेरबंद करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
गडचिरोली आणि देसाईगंज वन विभागात सध्या ‘टी ६’ या वाघिणीची प्रचंड दहशत आहे. मधल्या काळात वन विभागाने या वाघिणीला जेरबंद करण्याची मोहीम हाती घेतली होती. चंद्रपूर आणि मेळघाट येथील पथकाला तिने बऱ्याचदा हुलकावणी दिली. दरम्यान, वन विभागाच्या एका कॅमेऱ्यात ती चार पिल्लांसह दिसून आल्याने जेरबंद करण्याची मोहीम स्थगित करण्यात आली होती. परंतु ही वाघीण पूर्वीपेक्षा अधिक आक्रमक झाली असून आठवडाभरात तिने चातगाव वनपरिक्षेत्रात दोन बळी घेतले. वाघिणीच्या दहशतीमुळे शेतीची कामे करणेदेखील जोखमीचे झाले आहे. आतापर्यंत दोन्ही वन विभागात या वाघिणीने १० नागरिकांचा बळी घेतला आहे. वाघिणीच्या बंदोबस्तासाठी वनविभाग पुन्हा एकदा जेरबंद करण्याची मोहीम हाती घेणार असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा- यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षांचा काँग्रेसला घरचा आहेर, म्हणाले…
पिल्लांसह वाघिणीला जेरबंद करणे कठीण
एकट्या वाघिणीला जेरबंद करणे जिकरीचे ठरत असताना चार पिल्लांसह तिला पकडणे वन विभागासमोर मोठे आव्हान ठरणार आहे. प्रौढ वाघाला पकडताना बेशुद्ध करणाऱ्या इंजेक्शनचा वापर करतात. मात्र, पिल्लांना पकडताना जाळीचा वापर करावा लागणार आहे. अशाप्रकारे पिल्लांसाह वाघिणीला पकडण्याची खूप कमी प्रकरणे आहेत. त्यामुळे या मोहिमेत वन विभागाची चांगलीच दमछाक होणार आहे. यासाठी वन विभाग काही संस्थांची देखील मदत घेणार आहे.