लोकसत्ता टीम
वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील गिरड धोंडगाव परिसरात वाघीण शोध घेत आहे आपल्या पिल्लाचा. मात्र पिल्लू आता परत दिसणार नाही हे तिच्या गावी नाही. कारण तीन दिवसापूर्वी चार पैकी एका चार महिन्याच्या शावकाचा अपघातात मृत्यू झाला. मात्र एक बाळ दिसेनासे झाल्याने वाघीण सैरभैर झाल्याचे म्हटल्या जाते. धोंडगाव शिवारात या वाघीनीने शुक्रवारी रात्री गायीचा फडशा पाडला. धोंडगाव येथील शेतकरी नंदकिशोर थुटे यांच्या स्मशानभूमीजवळ असलेल्या शेतातील गायीवर या वाघीनीने हल्ला चढविला. गावातील एका महिलेने वाघीणीस पाहल्याचे म्हटल्या जाते. तसेच या ठिकाणी पगमार्क आढळून आल्याचे वन विभाग कर्मचारी सांगतात.
वन अधिकारी मात्र वाघीणीचे वर्तन वेगळे असे काही नसल्याचे सांगतात. गावकरी मात्र दहशतीत असल्याचे चित्र आहे. सैरभैर वाघीण डरकाळ्या मारत असल्याचे ते म्हणतात. वाघीणीचा प्रवास जंगलाकडे नव्हे तर रस्त्याच्या दिशेने सुरू असल्याची स्थिती आहे. म्हणून गावे भयभीत झाली आहेत. त्यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. सहाय्यक वन संरक्षक नीलेश गावंडे हे म्हणाले की रस्त्याच्या दिशेने ज्या ठिकाणी अपघात घडून शावक ठार झाले होते तिथे निगराणी ठेवल्या जात आहे. तीनशे मिटर अंतरपर्यंत बॅरिकेटिंग केल्या जात आहे. रात्रीच्या वेळी हे असे रस्त्याच्या दुतर्फ अडथळे लावल्या जात आहे. तसेच अपघात झालेल्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. ही अश्या प्रकारची खबरदारी चवताळालेल्या वाघीणीसाठीच आहे.
गावकरी मात्र वाघीण चवताळून वाघीण हल्ले करू शकते, या भीतीत वावरत असल्याची चर्चा होते. भवनपुर, माजरा, शिरपूर, धोंडगाव व साखर बाहुली या पाच गावात भिती पसरली आहे. गावाच्या वेशीवर पण डारकळ्या ऐकल्याचे गावकरी म्हणतात. शेतकरी शेतात किंवा अन्यत्र जाण्यास भीत आहेत. वाघीण दिसली, अशी सर्वत्र चर्चा असल्याने वन खाते चांगलेच कामास लागले. शेती कामे ठप्प पडलीत. पण वाघीण आणि तिचे आता तीन शावक यांचा अद्याप छडा लागत नाही. गत एक महिन्यापासून वाघीणीचे कुटुंब या परिसरात भ्रमंती करीत आहे. यापूर्वी दोन जनावरे या वाघीणीच्या हल्ल्यात बळी गेली. पगमार्कच्या आधारे या वाघीणीचा सातत्याने शोध सुरू आहे. एक पिल्लू कमी झाले किंवा दिसत नाही म्हणून माता वाघीण हिंस्त्र होत असते काय, या विषयी ठोस असा निष्कर्ष नाही.