नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात व्याघ्रदर्शन म्हणजे ‘भरुन पावलो’ अशीच पर्यटकांची प्रतिक्रिया असते. या व्याघ्रप्रकल्पातील वाघांनी पर्यटकांना कधीच निराश केले नाही. उन्हाळ्यात तर क्वचितच पर्यटक निराश होऊन परततात. अलीकडच्या काही वर्षात मात्र, बाराही महिने पर्यटकांना व्याघ्रदर्शन होत आहे. व्याघ्रप्रकल्पाचे गाभा क्षेत्रच नाही तर बफर क्षेत्रात आणि इतरही क्षेत्रात वाघांची संख्या वाढल्याने सहज व्याघ्रदर्शन होते. उन्हाळ्यात मात्र बहूतांशी पाणवठ्यावरच वाघ आणि त्यांचे कुटुंबीय दिसून येतात. पाच वर्षांची ‘शिवानी’ तिच्या बछड्यासह सध्या पर्यटकांना दर्शन देत आहे.  आपल्या बछड्याला मोठे होत असताना जंगलाचे सर्व नियम बारकाईने शिकवत असल्याचा क्षण जागतिक वन्यजीव दिनी डेक्कन ड्रीफ्टचे वन्यजीवप्रेमी पियूष आकरे यांनी टिपला.

‘शिवानी’ वाघीण ही जवळजवळ पाच वर्षांची असून ताडोबा – अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या झरी – कोळसा वनक्षेत्रात वास्तव्याला आहे. या भागातील प्रसिद्ध ‘कुवानी’ वाघीणीची ती अपत्य. पहिल्यांदाच आई झालेली ‘शिवानी’   तिच्या बछड्यासह पर्यटकांना दर्शन देत आहे. ‘कुवानी’ वाघीण देखील अशीच धीट होती. कधी ती बांबूच्या रांजीमध्ये बछड्यांसह उभी राहायची. तर कधी पर्यटकांना पाहूनही न पाहल्यासारखे करत तिथेच अंगावर कोवळे ऊन घेत आडवी व्हायची. मध्येच तिचे बछडे तिच्या अंगाखांद्यावर खेळताना दिसायचे. झरीतील ‘कुवानी’  एक ज्येष्ठ, धैर्यशील वाघीण म्हणून ओळखली जाते.

या वाघिणीने आतापर्यंत चारवेळा बछड्यांना जन्म दिला आहे. ताडोबाच्या अनेक क्षेत्रात तिचे बछडे मोठे होऊन त्यांचा अधिवास निश्चित करत आहे. त्यातलीच ‘शिवानी’ ही वाघीण आहे. ती देखील आता आई झाली आहे. आणि ‘कुवानी’च्याच पावलावर पाऊल ठेवत तशीच वागत आहे. ‘कुवानी’ या वाघिणीच्या सर्व सवयी ‘शिवानी’ या वाघिणीत दिसून येतात. नुकतेच ती तिच्या बछड्यांसह ताडोबाच्या रस्त्यावर दिसून आली.

तिच्या बछड्याला ती जणू जंगलाचे सर्व नियम बारकाईने शिकवत होती. तो बछडा देखील तिच्या अंगावर खेळताना दिसून आला. पर्यटकांना ऐन पर्यटनाच्या रस्त्यावरच ‘शिवानी’ आणि तिच्या बछड्यांमधील मायलेकाचा हा बंध दिसून आला. जणू ‘शिवानी’ ही वाघीण तिच्या बछड्याला पर्यटक समोर आले तरी घाबरायचे नाही, हेच सांगत असावी आणि तिचा अविर्भाव देखील तसाच होता. बछडा मात्र निरागसपणे तिच्या अंगाखांद्यावर खेळत होता.

Story img Loader