यवतमाळ: जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात असलेल्या टिपेश्वर अभयारण्यात एक ‘छावा’ सध्या जंगलासोबतच पर्यटकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय. त्याच्या जोडीला ‘आर्ची’, ‘वीर’, ‘सितारा’, ‘तालाबवाली’, ‘जंजिर’ हे सर्व वाघ टिपेश्वरच्या जंगलात साम्राज्य करत आहेत. त्यांची एक झलक पाहण्यासाठी पर्यटक उतावीळ झाले असून, उन्हाने काहिली होत असतानाही टिपेश्वरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली आहे.

टिपेश्वर अभयारण्यात शनिवारी सायंकाळी सफारीसाठी आलेल्या अनेक पर्यटकांना आर्ची, छावा आणि वीर या वाघांची ‘सायटिंग’ झाली. जंगलातील त्यांची मस्ती बघून पर्यटक हरखून गेले. यवतमाळ येथील वन्यजीव छायाचित्रकार पवन गावंडे यांनी या वाघांच्या मस्तीचे अनेक मूड्स आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. ही सर्व छायाचित्रे समाज माध्यमांत आल्यानंतर टिपेश्वरमधील वाघांचा अधिवास दिवसेंदिवस अधिकच समृद्ध होत असल्याचे दिसत आहे.

३० एप्रिल १९९७ च्या अध्यादेशानुसार १४८.६२ चौ. कि.मी. क्षेत्राला टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषीत करण्यात आले. या अभयारण्याचे संचालन मुख्य वनसंरक्षक नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पेंच राष्ट्रीय उद्यानचे वनसंरक्षकक्ष तथा क्षेत्र संचालक करतात. या जंगलात असलेल्या टिपाई देवीच्या मंदिरावरून या अभयारण्यास टिपेश्वर नाव पडले आहे. अभयारण्य क्षेत्रात टिपेश्वर, मारेगांव आणि पिटापुंगरी अशी तीन गावे येतात. या अभयारण्यात इंग्रजांच्या काळातील देखणे विश्रामगृह आहे. अलिकडे निसर्ग वाचन आणि अभास केंद्रही येथे सुरू करण्यात आले आहे.

या अभयारण्यात सध्या २० ते २२ वाघ असल्याचे सांगण्यात येते. शिवाय, इतरही समृद्ध वन्यजीव या जंगलात आहेत. विविध प्रजातीच्या पक्षांनीही अभयारण्याच्या वैभवात भर घातली आहे. नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वरील पांढरकवडा येथून २० कि. मी. अंतरावर, यवतमाळहून घाटंजीमार्गे ६० किमी तर तेलंगणातील अदिलाबादपासून ४२ कि. मी. अंतरावर हे अभयारण्य आहे. पांढरकवडा येथून पर्यटकांना सुन्ना गेटमधून तर घाटंजी मार्गे गेल्यास माथनी प्रवेशदारातून टिपेश्वरमध्ये सफारीसाठी जाता येते. परिसरात अलिकडे विविध रिसॉर्ट आणि होम स्टेची सुविधा झाल्याने महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश या राज्यातील पर्यटकांचा ओढा येथे वाढला आहे.

टिपेश्वरमध्ये ‘अवनी’च्या आठवणी

‘अवनी टी-१’ या नरभक्षक वाघिणीमुळे टिपेश्वर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धीच्या झोतात आले. टिपेश्वरमध्ये आपल्या दोन बछड्यांसह राहणारी ही वाघिण भटकत अधिवासाच्या बाहेर गेली आणि पुढे पांढरकवडा, राळेगाव तालुक्यात तिने प्रचंड दहशत पसरविली. तिने जवळपास १३ लोकांना ठार केले. प्रसिद्ध शिकारी शफाअत अली खान यांचा मुलगा असगर यांनी वन विभागासोबतच्या शोधमोहिमेदरम्यान २ नोव्हेंबर २०१८ रोजी राळेगाव तालुक्यात अवनीस गोळ्या घालून ठार मारले. पुढे या अवनी वाघिणीवर ‍अभिनेत्री विद्या बालन हिची प्रमुख भूमिका असलेला ‘शेरणी’ हा चित्रपटही आला. अवनी वाघिणीवर शफाअत अली खान यांनी ‘अवनी – एका नरभक्षक वाघिणीची सत्यकथा’ हे पुस्तकही लिहिले आहे. टिपेश्वरमध्ये गेलेल्या पर्यटकांना ‘अवनी’ वाघिणीच्या थराराच्या अनेक सुरसकथा तेथील गाईड आजही सांगतात.