नागपूर : गेले कित्येक महिने ती गळ्यात फास घालून फिरत होती. तिच्या बछड्यांची काळजी वनखाते घेत होते, पण तरीही आईशिवाय ती अनाथच होती. तिचाही नाईलाज होता. गळ्यात फास अडकल्याने ती सैरभैर झाली होती. इकडून तिकडे फिरत होती. एका पर्यटकाच्या लक्षात ते आले आणि वनखात्याला ते लक्षात आले. तिच्या गळ्यातील फास काढण्यासाठी वनखात्याच्या चमूने खूप प्रयत्न केला, पण ती हाती लागत नव्हती.

महत्प्रयासानंतर ती हाती लागली. तिच्यावर उपचार झाले आणि ती पुन्हा मोकळेपणाने वावरण्यासाठी आपल्या घरात परत गेली. टिपेश्वर अभयारण्यातील “पिसी” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाघिणीला उपचाराअंती नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. टिपेश्वर अभयारण्यातील “पिसी” वाघिणीच्या गळयात तारेचा फास अडकला असल्याचे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी लक्षात आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या वाघिणीचे शोध व बचाव मोहीम वनखात्याने सुरू केली. २४ फेब्रुवारीला सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास या वाघिणीला डॉर्ट मारून यशस्वीरित्या बेशुद्ध करण्यात आले. वाघिणीच्या गळयातील तारेचा फास काढण्यात आला होता आणि पुढील उपचाराकरिता वाघिणीला पिंजरा बंद करण्यात आले होते.

त्यानंतर २४ फेब्रुवारी ते तीन मार्चपर्यंत डॉ. सायली तागरे, सहाय्यक पशु संवर्धन आयुक्त, पांढरकवडा व डॉ. रणजीत नाळे, पशु संवर्धन अधिकारी, पांढरकवडा तसेच कौस्तुभ गावंडे, पिपल्स फॉर अनिमल, वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली वाघीणीवर योग्य ते औषधोपचार करण्यात आले. मागील आठ दिवस औषधोपचार केल्यानंतर वाघीणीची जखम पूर्ण बरी झाल्याची पशु संवर्धन अधिकारी, पांढरकवडा यांची खात्री होताच त्यांच्या सल्ल्यानुसार तीन मार्चला सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास सदर वाघीणीला टिपेश्वर अभयारण्यात पिलखान नियतक्षेत्रात नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

सदर “पिसी” वाघीणीस फास मुक्त करणे, औषधोपचार पूर्ण करून परत नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याची मोहीम एम. आदर्श रेड्डी, वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. सदर मोहीम यशस्वी होण्याकरिता विभागीय वन अधिकारी उत्तम फड, सहाय्यक वनसंरक्षक रवींद्र कोंडावार, वनक्षेत्रपाल जगन्नाथ घुगे, वनक्षेत्रपाल प्रशांत सोनुले, वनपाल दिपक कुरेकर, वनपाल राजेश कुमरे, वनपाल शशांक सोनटक्के, वनपाल राजेश्वर रणमले तसेच टिपेश्वर अभयारण्यातील सहभागी सर्व वनरक्षक व सर्व वनमजूर यांनी क्षेत्रीयस्तरावर मोहीम यशस्वीरित्या पार पाडली.

Story img Loader