गोंदिया : शुक्रवारी रात्री गोंदिया जवळील ढाकणी या गावात लग्नाला आलेले कुटुंबीय आज शनिवारी सकाळच्या सुमारास दुचाकीने स्वगावी जात असताना भरधाव टिप्परने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना गोंदिया जवळील भागवतटोला परिसरात घडली. खुमेंद्र बिसेन (३७), आदित्य खुमेंद्र बिसेन (७) व आर्वी कमलेश तुरकर (५) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत.
माहेश्वरी खुमेंद्र बिसेन (३०) व मोहित खुमेंद्र बिसेन (५) सर्व रा. दासगाव ता. गोंदिया अशी गंभीर जखमींची नावे आहेत.
हेही वाचा – चंद्रपूर : लोकांच्या जिवावर उठलेला बिबट अखेर जेरबंद
या संदर्भात रामनगर पोलीस निरीक्षक बास्तावडे यांनी सांगितले, खुमेंद्र बिसेन हे पत्नी व मुलांसह गोंदिया जवळील ढाकणी या गावी रात्री लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी आले होते. दासगावला परत जाताना टिप्पर क्रमांक एम.एच.३५ – के. ०२९८ ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात खुमेंद्र बिसेन व त्याचा मुलगा आदित्य व भाची आर्वी या तिघांचाही जागीच मृत्यू झाला. जखमी माहेश्वरी बिसेन हिला गोंदिया जिल्हा रुग्णालयात तर मोहित बिसेन यास खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बास्तवडे यांनी पथकासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी आरोपी टिपर चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे हे करीत आहेत.