नागपूर: गेल्या आठवड्यात समृद्धी महामार्गावर झालेला अपघात आणि गेल्या काही दिवसात सातत्‍याने अपघाताची मालिका सुरू आहे. ती खंडित करण्‍यासाठी जनआक्रोश या सामाजिक संस्‍थेने पुढाकार घेतला आहे. समृद्धी महामार्गावरील अपघातांची कारणे शोधून काढण्‍यासाठी तसेच, वाहन चालकांमध्‍ये जागृती निर्माण करण्‍यासाठी महिन्‍यातून चार वेळा समृद्धी महामार्गाला भेट देऊन तेथील परिस्थितीचा अभ्‍यास करण्‍याचा निर्धार जनआक्रोशने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुधवारी सकाळी जनआक्रोशचे रवी कासखेडीकर यांच्‍या नेतृत्‍वातील ४० सदस्‍यांच्‍या पथकाने समृद्धी महामार्गाला भेट दिली व तेथील रस्त्याची स्थिती व त्याअनुषंगाने अपघात होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या इतर बाबींचा अभ्यास केला. बुलढाणा जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या २५ जणांच्या मृत्यूसंदर्भात झालेल्या अपघाताच्या अनुषंगाने हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता.

हेही वाचा… नागपूर : महापालिकेवर काँग्रेसचा मोर्चा, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेतले ताब्यात

या अभ्यास दौ-यादरम्‍यान, ट्रकचालक वाहन चालवताना तसेच, कारचे ड्रायव्हर आणि मागे बसलेले सहप्रवासी देखील सीट बेल्ट लावत नसल्‍याचे आढळून आले. अनेक वाहनांचे टायर जुने असल्‍यामुळे ते फुटल्याचे या अभ्‍यासात निदर्शनास आले. जनआक्रोशच्‍या ट्रॅफिक एज्युकेशन कार्यक्रमाअंतर्गत सर्व वाहनचालकांना सीट बेल्ट लावण्‍याची यावेळी विनंती करण्‍यात आली. तसेच, उत्तम दर्जाच्या सिमेंट रस्त्यांवरून जाताना गाडीच्‍या टायरमध्ये नेहमी १० टक्के कमी नायट्रोजन भरा, रस्ता संमोहन टाळण्यासाठी दर २ तासांनी विश्रांती घ्‍या, वेगमर्यादेचे निकष पाळा, लेनशिस्त काटेकोरपणे पाळा, इत्‍यादी सूचना करण्‍यात आल्‍या. तसेच, त्‍या संदर्भातील माहितीपत्रके वाटण्‍यात आली.

हेही वाचा… मंत्रिमंडळ विस्तारात नागपूर जिल्ह्यातून समीर मेघेंना संधी?

चिखलीचे माजी आमदार बोंडे यावेळी उपस्‍थ‍ित होते. त्‍यांनी रस्त्यांवरील अपघात कमी करण्यासाठी वाहतूक शिक्षणाच्या जनआक्रोशच्‍या कार्याचे कौतुक केले. समृद्धी महामार्ग वापरकर्त्यांनी रस्त्यावरील शिस्तीचे काटेकोरपणे पालन केल्यास निश्चितच अपघात मोठ्या प्रमाणात कमी होतील आणि अनेकांचे जीव वाचतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा… जयंत पाटलांनी बडतर्फ केलेले गुजर अजित पवारांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष

रस्‍ते अपघातांचे प्रमाण कमी करण्‍यासाठी व लोकांचे संसार उध्‍वस्‍त होण्‍यापासून वाचवण्‍यासाठी जनआक्रोशतर्फे सातत्‍याने जनजागृती मोहिम राबविण्‍यात येत आहे. नागरिकांनी स्‍वत: रस्‍ते नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व इतरांनाही सांगावे. जनआक्रोशच्‍या या मोहिमेत नागरिकांनी मोठ्या संख्‍येने सहभागी व्‍हावे, असे आवाहन जनआक्रोशचे रवी कासखेडीकर (९४२२१०५९११) यांनी केले आहे.