‘मेरा गाव मेरा भारत’चा संतप्त सवाल
जनतेला कचरा टाकण्यास प्रोत्साहित करणे, तसे केल्यामुळे त्यांना दंडित करणे आणि झालेला कचरा उचलण्यासाठी जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणे, हे कोणते ‘स्वच्छ भारत व सुंदर भारत’ अभियान आहे, असा संतप्त सवाल ‘मेरा गाव मेरा भारत’चे मुख्य संयोजक मुन्ना महाजन यांनी केला. अस्वच्छतेसाठी केवळ सफाई कर्मचाऱ्यांना दोषी न धरता महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या कामाचा चेहरा आरशात बघून कामात सुधारणा करावी, असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी स्वच्छ व सुंदर भारत करण्याचे जनतेस व शासनास मार्गदर्शन केले आहे. केंद्र व राज्य शासन या नागपूरला ‘स्मार्ट सिटी’ करू इच्छिते. दक्षिण नागपुरातील छोटा ताजबागच्या मागे सक्करदरा तलाव आहे. याला सुंदर करण्यासाठी शासन व महापालिका यांनी मागील वर्षी लाखो रुपये खर्च केले. शासन व महापालिका तलाव स्वच्छ करण्यावर, कचरा उचलण्यावर व शहर स्वच्छ ठेवण्यावर कोटय़वधी रुपये खर्च करीत आहे. या माध्यमातून जनतेचा पैसा व विश्वास संपवण्याचे कार्य प्रशासनाकडून होत आहे. महापालिका सफाई कर्मचारी वस्त्यावस्त्यातील कचरा गोळा करून कचरा पेटीत न टाकता तलावात टाकतात. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणे, जनतेला कचरा टाकण्यास प्रोत्साहित करणे व जनतेला कचऱ्यासाठी दंड करणे, हे कोणते स्वच्छ भारत व सुंदर भारत अभियान आह?, महापालिका प्रशासन पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात धूळ टाकत आहे काय? असा प्रश्न आम्हा जनतेसमोर आहे. हा प्रकार गरीब कर्मचारी करीत आहेत, असे नाही. वरिष्ठ अधिकारी सर्व योजना बरोबर आखत नाही, योजना सुरळीत चालते की नाही, यावर नजर ठेवत नाहीत, म्हणून लहान कर्मचारी त्रासून हे कृत्य करतो, असे आमच्या लक्षात आले आहे. योजना कशी असावी याकरिता आमच्या मेरा गाव मेरा भारत या संस्थेनी स्वखर्चाने प्रभाग क्रमांक ४१ मध्ये सफाई कर्मचाऱ्यांना मागील तीन वर्षांपासून स्वच्छतेचे प्रशिक्षण देत आहे. कचरा गोळा करणाऱ्या १० कर्मचाऱ्यांना शेगाव येथे संत गजानन महाराज देवस्थानातील अप्रतिम स्वच्छता राखण्याच्या कार्याचे प्रशिक्षण दिले. त्याप्रमाणे प्रभाग क्रमांक ४१ मध्ये स्वच्छतेचे कार्य सुरू आहे. या संदर्भातील निवेदन महापालिकेला देण्यात आले आहे. या शिष्टमंडळात भगवानदास राठी, दिलीप गायधने, आनंद सावजी, विनोद लांजेवार, नागेश हरदास, बागेश महाजन, दिलीप नरवाडीया, विवेक पारकर आदी मंडळींचा समावेश होता.