यवतमाळ: हातात आलेल्या विविध गॅझेट्समुळे वाचक पुस्तकांपासून दुरावल्याची खंत स्वस्थ बसू दवत नसल्याने घाटंजी येथील प्राध्यापकांनी ‘सेल्फी विथ अ बुक’ हे अभियान सुरू केले. वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने राबविलेल्या या उपक्रमात अनेक दिग्गजांनी सहभागी होऊन, मोबाईलमध्ये रमलेल्या पिढीला पुस्तकांकडे वळण्याचे आवाहन केले.
घाटंजी येथील शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित एसपीएम विज्ञान वगिलानी कला वाणिज्य महाविद्यालयातील प्रा. डॉ. विवेक जगताप यांनी जिल्ह्यातील अनेक मान्यवारांना भेटून त्यांनी वाचलेल्या पुस्तकामुळे ते कसे घडले याबाबत मत जाणून घेत ‘सेल्फी विथ अ बुक’ या अभियानांतर्गत आपल्या आवडत्या पुस्तकासोबत एक सेल्फी काढून तयार केलेल्या लिंकवर अपलोड केल्या. १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत हे अभियान राबविण्यात आले. या अभियानात मान्यवरांसोबतच तरुणांनीही सहभाग नोंदविला. विविध महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग तसेच विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला आहे.
हेही वाचा… पोलीस उपनिरीक्षक भरतीसाठी शारीरिक चाचणीला अखेर मुहूर्त
‘सेल्फी विथ अ बुक’ हे अभियान वाचनाला चालना देऊन ही सवय आनंददायक आणि समृद्ध करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात आल्याचे प्रा. डॉ. विवेक जगताप यांनी सांगितले. सोशल मीडिया आणि सेल्फीच्या लोकप्रियतेमुळे, तरुणांना आकर्षित करणारे अभियान आवश्यक होते. त्यासाठी सेल्फी विथ बुक ही संकल्पना राबवून तंत्रज्ञान आणि साहित्य एकत्र करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रा. जगताप म्हणाले. वाचनाची आवड निर्माण करणे आणि वाचनालयाच्या संसाधनांसह तरुणांना सक्रिय सहभागास प्रोत्साहन देणे हा अभियानाचा उद्देश आहे, असे ते म्हणाले. या प्रयोगामुळे तरुणांमध्ये वाचन संस्कृती वाढेल, असा विश्वास डॉ. विवेक जगताप यांनी व्यक्त केला. या अभियानासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदृद्दिनजी गिलानी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. शहेजाद, माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे, डॉ. प्रदीप राऊत यांच्यासह अनेक महाविद्यालयातील प्राध्यापक, पत्रकार, शिक्षकांनी सहभाग दिला.