चंद्रपूर : कॉग्रेस पक्षात राहून भाजपासाठी स्लिपर सेल म्हणून काम करणऱ्या पदाधिकाऱ्यांचा शोध घेण्यासाठी तसेच माझी मुलगी, मुलगा, भाऊ, पुतण्या असे कुटूंबातच आमदार, खासदार व महत्वाची पदे राहावीत, अशी भूमिका असलेल्या जिल्ह्यातील कॉग्रेस लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकाऱ्यांना सर्वाेदय विचारांचे धडे देण्यासाठी कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी २३ व २४ मार्च असे दोन दिवस निवासी सर्वोदय संकल्प शिबिराचे आयोजन राजुरा येथे केले आहे. या शिबिराच्या माध्यमातून गांधी विचार विस्म़ृतीत गेलेल्या कॉग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांना गांधी विचारांची उजळणी करून दिली जाणार आहे.

कधी काळी सहा आमदार व एक खासदार निवडून येणाऱ्या या जिल्ह्यात कॉग्रेसची काय अवस्था झालेली आहे याची कल्पना साऱ्यांनाच आहे. जिल्ह्यात आज कॉग्रेसचा एक खासदार व एक आमदार आहे. मात्र आमदार खासदार एकमेकांना पाण्यात पाहतात ही वस्तूस्थिती आहे. मागील वर्षभरात खासदार प्रतिभा धानोरकर व आमदार विजय वडेट्टीवार एका मंचावर एकत्र आलेले नाही. त्यामुळे कॉग्रेस पक्षाची पुरती वाट लागली आहे. कॉग्रेस पक्षात पदाधिकारी राहून भाजपासाठी स्लीपर सेल म्हणून काम करणारे अनेक पदाधिकारी या जिल्ह्यात आहेत. त्यामुळेही पक्ष रसातळाला गेला आहे. नष्ठावंत सतरंजी उचलणाऱ्या कार्यकर्त्यांला आमदार, खासदारकीची उमेदवारी देण्याऐवजी स्वत:ची मुलगी, भाऊ, पुतण्या यांनाच उमेदवारी व पदे देणारी कॉग्रेसची नेते मंडळी आहे. त्यामुळेही पक्ष जिल्ह्यात अखेरच्या घटका मोजत आहे. अशा कठीण परिस्थिीतीत कॉग्रेस पक्षाला गांधींचा सर्वाेदयी विचार देण्यासाठी कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ येथे येत आहेत.

येत्या २३ आणि २४ मार्चला राजुरा येथील धनोजे कुणबी सभागृहात राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्यावतीने सर्वाेदय संकल्प शिबीराचे आयोजन केले आहे. या शिबीराला कॉग्रेस विधीमंडळ गटनते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, आमदार सुधाकर अडबाले, आमदार ॲड. अभिजित वंजारी यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेतील आजी-माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या दोन दिवसीय निवासी शिबिरात कॉग्रेस पक्षाचा इतिहास, स्वातंत्र्य लढ्यातील कॉग्रेसचे योगदान, स्वातंत्र्यत्तोर काळातील विकास कार्यक्रमात कॉग्रेसची भूमिका आदी विषयांवर उदबोधन करणार आहे.

हे दोन दिवसीय शिबीर निवासी आहे. त्यात शिबिरार्थीना नाममात्र शंभर रुपये शुल्क अदा करावे लागणार आहे. विशेष म्हणजे गांधी आश्रमातील दिनचर्या या शिबिरात राहणार आहे. नियमांचे कोटकोर पालन करावे लागणार आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारचे शिबीर जिल्ह्यात होत आहे. नवे प्रदेशाध्यक्ष येणार आहे. नेहमी नेत्यांच्या मागे चमकोगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचाही उत्साह शिगेला पोहचला आहे.

एरवी प्रदेशाध्यक्ष आल्यानंतर नेहमी एकमेकांविरोधात तक्रारीचा पाऊस पाडणाऱ्या या नेत्यांना आता गांधी तत्वज्ञानाचे धडे गिरवावे लागणार आहे. पंचतारांकीत व्यवस्थेशिवाय कोणत्याही बैठकीला उपस्थित न राहणाऱ्या कार्यकर्त्यांना आता गांधी आश्रमाती दिनचर्या सहन होईल का, असाही प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. कॉग्रेसचा इतिहास आणि पक्षाची विचारधारा याबाबत कॉग्रेसच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांना असलेले ‘ज्ञान’ सर्वश्रृत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासह पक्षांच्या दिवंगत नेत्यांवर समाजमाध्यमात खालच्या पातळीवर टिका झाली तरी ते शांत असतात. एवढे प्रेम आणि ज्ञान या कार्यकर्त्यांना आहे. विचारधार माहिती नाही. दुसऱ्या पक्षात संधी नाही. सत्तेत असताना सेट झालेल्या धंद्यांना झळ पोहचू नये, यासाठी बहुतांश कार्यकर्ते आणि पदाधिकारी माहित नसलेल्या सर्वोदयी विचाराला चिकटून आहे. नेत्यांचीही वागणूक यापेक्षा वेगळी आहे. मतदार संघाचा सातबारा आपल्या नावावर असल्यासारखी या नेत्यांची कार्यकर्त्यांशी वागणूक असते. माझ्या घरातीलच व्यक्ती हवा, असा सर्वाेदयी विचार या जिल्ह्यातील कॉग्रेसच्या बहुतांश नेत्यांमध्ये बघायला मिळतो. या पार्श्वभूमीव कॉग्रेसचे संघटन वैचारिक पातळीवर पुन्हा बळकट व्हावे.

नेत्यांसोबतच कॅांग्रेसच्या लहान-थोर पदाधिकाऱ्यांना विचारधारा माहिती व्हावी, यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ प्रयत्न करीत आहे. परंतु सर्वांच्या कल्याणाचा विचार कॉग्रेसवर पकड असलेल्या जिल्ह्यातील नेत्यांच्या मनात येईल काय हाच सर्वोदयी प्रश्न कॉग्रेस निष्ठावंतांना आहे. माझे कुटुंब आणि माझा माणूस यापलिकडे राजकारणात विचार न करणाऱ्या जिल्ह्यातील कॅांग्रेस नेत्यांना हा विचार पचणी पडणार का, असा प्रश्न आता कार्यकर्ते एकमेकांना विचारत आहे.

Story img Loader