वाशीम : राज्यात राजकीय भूकंप होऊन राष्ट्रवादीचे फायरब्रांड नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकून शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यातील राष्ट्रवादी दोन गटांत विभागली. वाशीम जिल्ह्यातदेखील दोन गट पडले असून काही नेत्यांनी भूमिका स्पष्ट केली असली तरी, वर्षानुवर्षे पक्षाची कास धरलेले कार्यकर्ते मात्र प्रचंड संभ्रमात असून साहेब की दादा, कुणासोबत जावे, यासाठी अडचणीत सापडले आहेत.
जिल्ह्यात राष्ट्रवादी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आघाडीवर आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समितीमध्ये पक्षाची ताकद आहे. आधीच गटा ताटात पोखरलेली राष्ट्रवादी काँग्रेस नुकतीच उभारी घेत असताना अजित पवार यांच्या बंडामुळे पुन्हा दोन गटांत विभागली आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते सोईची भूमिका घेत असताना कार्यकर्ते मात्र चांगलेच संभ्रमात पडले असून दादा, की साहेब या द्विधा मनस्थितीत आहेत. जिल्ह्यातील कोणता नेता कोणत्या गटात आहे. हे अद्याप अस्पष्ट असून लवकरच चित्र स्पष्ट होईल. दोन्ही गटांतील नेत्यांनी बैठकांचा सपाटा लावला असून कार्यकर्त्यांची मनधरणी केली जात आहे.