चंद्रपूर: राजुरा शहरातील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत बापूजी पाटील मामुलकर प्रतिष्ठान च्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीपुर्वी या निवडणूकीत आपल्याला सत्ता मिळावी, या लालसेपोटी संस्थेतील एका संचालकाने आपल्या नातलग व्यक्तींना सामिल करीत अन्य संचालकांच्या घरी जाऊन सोफ्यात काळा धागा बांधून हळद, कुंकू लावून काही अवांछनीय वस्तू ठेवल्या. हे संचालक सायंकाळी घरी गेल्यानंतर या बाबींची वाच्चता होताच व काही लपवून ठेवलेल्या वस्तू निदर्शनास आल्याने सर्वच घाबरून गेले. उपलब्ध सीसी टीव्ही वर हा सर्व प्रकार उघडकिस आला. या अंधश्रध्देला खतपाणी देणा-या प्रकाराविषयी संस्थेच्या चार संचालकांनी राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून कायदेशीर कार्यवाहीची मागणी केली आहे. या प्रकारामुळे येथे एकच खळबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बापूजी पाटील मामुलकर प्रतिष्ठान या संस्थेतर्फे काही शाळा संचालित करण्यात येतात. या संस्थेचा कार्यकाळ पुर्ण झाल्याने सहाय्यक धर्मदाय आयुक्त, चंद्रपूर यांच्या आदेशाने १५ आक्टोंंबर २०२३ ला निवडणूक घेण्यात आली. तत्पुर्वीच ६ ते १० आक्टोंंबर दरम्यान या संस्थेतील एका संचालकाने आपल्या विरोधी सहा संचालकांच्या घरी स्वत: व आपल्या नातेवाईकांना पाठवून असा अघोरी प्रकार केला. या संस्थेच्या निवडणूकीत आपल्याला यश मिळावे, असा या संचालकाचा उद्देश असल्याचा आरोप आहे. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या गैरअर्जदारावर जादूटोणाविरोधी कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

अंधश्रध्देच्या या प्रकारामुळे सर्व संचालकांचे कुटुंबिय भयभीत झाले असून संबधितांची कुटुंबाला अन्य हिंसक मार्गाने इजा पोहचवू शकण्याची शक्यता असल्याने कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ही बाब उघडकीस येताच घरी व शेजारच्या सीसीटीव्ही वर शहानिशा केली असता तीन महिला व एक पुरूष यांनी सहा संचालक घरी नसतांना त्यांचे घरी जाऊन कुटुंबियांना पाणी मागून ते जाताच सोफ्याच्या आत काही वस्तू दडवून ठेवल्या.

हेही वाचा… भीम आमीं ‘या’ चार राज्यात निवडणूक लढणार

कधीही घरी न येणा-या महिला व पुरूष अचानक घरी आल्याने यातील काही संचालकांनी सिसिटीव्ही बघीतला असता त्यांचे बिंग फुटले. यानंतर या संचालकांनी घरी येणा-यांना विचारले असता त्यांनी एका संचालकाच्या सांगण्यानुसार वस्तू ठेवल्याची कबूली दिली. पोलिस तक्रारीत सीसीटीव्ही फुटेज, ऑडीओ रेकाॅर्डींग व सापडलेल्या वस्तू राजुरा पोलिस ठाण्यात जमा करण्यात आल्या आहेत. आदर्श शिक्षण संस्था आणि त्यानंतर बापूजी पाटील मामुलकर प्रतिष्ठान या संस्थेतील वाद आता कोणत्या स्तरावर जाईल, याबद्दल नागरिकांत चर्चा सुरू आहे.

बापुजी पाटील मामूलकर प्रतिष्ठान च्या चार संचालकांच्या पोलिस ठाण्यात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असून सर्व बाबी तपासून पुढील कार्यवाही करण्यात येईल. – योगेश्वर पारधी, ठाणेदार, राजुरा पोलीस ठाणे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To win the election of bapuji patil chandrapur mamulkar pratishthan one of the directors did an act of superstition in other directors house rsj 74 dvr