लोकसत्ता टीम
वर्धा: सोमवारच्या आंदोलनापूर्वी आज देशव्यापी सत्याग्रह छेडण्याचा निर्णय अखिल भारतीय काँग्रेस समितीने घेतला आहे. राज्य व जिल्हा मुख्यलयी गांधी पुतळ्याच्या साक्षीने हा सत्याग्रह दिवसभर करण्याची सूचना राष्ट्रीय महासचिव के.सी.वेणुगोपाल यांनी केली आहे. पक्षनेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ हा सत्याग्रह होत आहे.
ही बाब जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीसाठी धोकादायक ठरली आहे. आवाज दाबण्याचा हा कुटील प्रयत्न आहे. राहुल गांधी यांनी मोदी हे त्यांच्या प्रिय मित्रांना मदत करण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग करीत असल्याबद्दल विरोध केला. त्यामुळे त्यांचा आवाज बंद करण्याचा हा प्रकार होत आहे. त्यांच्या या कृतीचा तीव्र निषेध करणार. राहुल गांधी यांच्या या लढाईत लाखो काँग्रेसी सोबत आहेत, असे प्रदेशाध्यक्षांना पाठविलेल्या पत्रातून स्पष्ट करण्यात आले. या संकल्प सत्याग्रहात सर्व लोकप्रतिनिधींनी तसेच पक्ष पदाधिकाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.