नागपूर : मोसमी पावसाने दीर्घकाळासाठी घेतलेली विश्रांती जीवघेणी ठरत असतानाच पावसाने पुनरागमन करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. हवामान खात्याने १८ ऑगस्टपासून पाऊस परतणार अशी केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे. शुक्रवारपासूनच पावसाला सुरुवात झाली.
विदर्भासह मराठवाड्यातही शुक्रवारी पावसाने हजेरी लावली. तर पुणे, नाशिकसह सातारा आणि घाटमाथ्यावरील परिसरातही काळे ढग दाटून आले आणि पावसाचे आगमन झाले. वातावरणात गारवा पसरला. हा पाऊस आणखी काही दिवस परतलाच नसता तर सर्वात कोरड्या ऑगस्ट महिन्याची नोंद झाली असती. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने येत्या चार दिवसांसाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होताना दिसत आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत हा पाऊस हिमालयाच्या पायथ्याशी पुन्हा सक्रीय होईल. तिथे ऑगस्टच्या अखेरपर्यंत पावसात सातत्य पाहायला मिळेल. या दरम्यान मध्य भारतात मात्र पावसाचे प्रमाण कमी राहील, अशी माहिती हवामान विभागानं दिली.
हेही वाचा : २५ वर्षांपासून धावतेय ‘ज्ञानेश्वरी’! यासाठी होते विशेष आकर्षण; त्या भीषण काळ रात्रीचा..
शुक्रवारी विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपुरात चांगला पाऊस झाला. शनिवारी म्हणजेच पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट नसला तरीही अहमदनगर आणि सोलापूरला यलो अलर्ट देण्यात आला आहे. २० ऑगस्टसाठीही विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. फक्त विदर्भ, मराठवाडाच नाही, तर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरीतही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रविवारी कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळेल. तर त्यापुढील दोन दिवस म्हणजेच २१ आणि २२ ऑगस्टलाही अशीच परिस्थिती पाहायला मिळू शकते, असे हवामान खात्याने म्हटले आहे.