अकोला : २०२५ या वर्षभरात सूर्य व चंद्र यांची प्रत्येकी दोन अशी चार ग्रहणे आहेत. याच महिन्यात १४ मार्चला चंद्रग्रहण झाले. येत्या २९ मार्च रोजी, शनिवारी खंडग्रास सूर्यग्रहण होणार आहे. ग्रहण हा एक निसर्गातील सावल्यांचा खेळ असून याला काहीसा वेळ देऊन त्याचा आनंद घ्यायलाच हवा, असे मत खगोल निरीक्षक प्रभाकर दोड यांनी व्यक्त केले आहे.

यंदाच्या चार ग्रहणांपैकी ७ ऑक्टोबरचे खंडग्रास चंद्रग्रहण भारतीयांना प्रत्यक्ष बघायला मिळेल. यावर्षी फाल्गुनी अमावस्येला होत असलेले खंडग्रास सूर्यग्रहण आशिया खंडाचा उत्तर भाग युरोप, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि उत्तर व दक्षिण अमेरिका भागात बघता येईल. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्या एका रेषेत येण्याची स्थिती महत्त्वाची असते. चंद्र आणि पृथ्वी यांच्या कक्षेत सव्वा पाच अंशाचा कोन असल्याने दर पौर्णिमा, अमावस्येला ग्रहण होत नाही, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.

जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये जातो तेव्हा सूर्यग्रहण होते, ज्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. सूर्यग्रहण फक्त अमावस्येच्या वेळीच होऊ शकते. चंद्राची कक्षा पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या कक्षापासून ५ अंशांवर आहे. २९ मार्च रोजी चंद्राच्या चढत्या कक्षेत ०.९३७६ तीव्रतेसह आंशिक सूर्यग्रहण होईल. जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्यामधून जातो, तेव्हा सूर्यग्रहण होते, ज्यामुळे पृथ्वीवरील दर्शकांसाठी सूर्याची प्रतिमा पूर्णपणे किंवा अंशतः अस्पष्ट होते. भारतीय प्रमाणवेळेनुसार सूर्यग्रहण २९ मार्च रोजी दुपारी २:२०:४३ वाजता सुरू होईल, त्याचा शिखर ४:१७:२७ वाजता येईल आणि ४:१३:४५ वाजता संपेल.

कुठे व कसे बघाल पाच ग्रह

आकाशात नुसत्या डोळ्यांनी संध्याकाळी दोन तर पहाटे तीन असे पाच ग्रह सहज बघता येतील. सर्वात मोठा गुरु ग्रह संध्याकाळी वृषभ राशीत आकाश मध्याशी तर लाल रंगाचा मंगळ ग्रह गुरूच्या जरा पूर्वेस मिथुन राशीत आणि बुध, शूक्र आणि शनी ग्रह पहाटे पाच दरम्यान पूर्व आकाशात पाहता येतील. सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी शनी ग्रह २९.५ वर्ष लावतो. शनी ग्रह कुंभ राशीतून मीन येईल. याचा अर्थ शनी ग्रहाचा मुक्काम पुढील अडीच वर्षे मीन राशीत असेल. ग्रह हे आपल्यापासून खूप दूर असून त्याच्या निरीक्षणाचा मनमुराद आनंद आपण घेतला पाहिजे, असे प्रभाकर दोड म्हणाले.