नागपूर : मी क्रिकेट खेळायचो. मला चांगले संगीत ऐकण्याची, नाटक बघण्याची आवड आहे. स्वयंपाक करण्याचीही आवड आहे. त्यामुळे करोना काळात थोडाफार वेळ काढून स्वयंपाकही केला, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या पाककलेचे गुपित सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महालातील ज्या नवयुग शाळेत गडकरी यांनी पाचवी ते सातवीपर्यंत शिक्षण घेतले. त्याच शाळेतील विद्यार्थ्यांशी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला गडकरी यांनी संवाद साधला. ते म्हणाले, शालेय जीवनात मला मराठी साहित्याची, संगीताची गोडी लागली. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचो. माझ्यातील वक्तृत्व शाळेतच विकसित झाले. त्यानंतर विद्यापीठात वादविवाद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. पुढे राजकीय प्रवास सुरू झाला. माझ्या या संपूर्ण जडणघडणीत शाळेतील संस्कारांचे मोठे योगदान आहे. आज मी जे काही आहे, ते शाळेतील शिकवणीमुळेच आहे. शाळेत असताना महापुरुषांच्या जीवनावर आधारित पुस्तकांमध्ये वाचलेली प्रेरणादायी वाक्य, देशभक्तीपर गीते आजही लक्षात आहेत. शाळेत असताना म.म. पुरंदरे, बाळशास्त्री हरदास, प्राचार्य राम शेवाळकर यांची व्याख्याने आम्ही ऐकायचो. इतिहासामध्ये, आपली संस्कृती जाणून घेण्यात विशेष रस निर्माण झाला, असेही गडकरींनी सांगितले.

हेही वाचा – राज्यातील मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू, महाराष्ट्र मंदिर महासंघाचा निर्णय, नागपुरात आजपासून सुरुवात

सेवेसाठी राजकारणात

राजकारणात कसे आले या प्रश्नावर गडकरी म्हणाले, ‘मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होतो. १९७५ मध्ये आणीबाणी लागली तेव्हा त्याविरुद्ध संघर्ष केला. १९७७ मध्ये जनता पक्षात प्रवेश केला आणि राजकारणात आलो. माझ्यासाठी राजकारण म्हणजे सेवा आहे. देशाच्या हिताची कामे करणे म्हणजे राजकारण असल्याचे गडकरी म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Took out time to cook during corona period says nitin gadkari vmb 67 ssb