नागपूर : आजच्या धावपळीच्या काळात एकीकडे नागरिकांचे मुखाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. तर दुसरीकडे दातांची कीड, हिरड्यांचा आजार असलेल्यांना हृदयरोगाची जोखीम अधिक असते, असे निरीक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) दंतशास्त्र विभागाने नोंदवले आहे. आज, राष्ट्रीय मुखरोगनिदान व क्ष-किरणशास्त्र दिन असून त्यानिमित्ताने घेतलेला हा आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेडिकल रुग्णालयातील दंतशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. कांचन पाटील म्हणाल्या, दंताशी संबंधित विविध संशोधनात मौखिक आरोग्य जसे दातांमधील कीड-हिरड्यांच्या आजारांमुळे जवळजवळ १९ टक्के हृदयरोग होण्याचा धोका वाढतो. हा धोका ६५ वर्षांवरील नागरिकांमध्ये ४४ टक्के इतका वाढतो. मधुमेहग्रस्ताला हिरड्यांचे आजार असल्यास त्यांचा मृत्यूदर हा सामान्य रुग्णांच्या तुलनेत ३.२ पटीने वाढतो. मधुमेहग्रस्त हिरड्यांच्या आजारावर लगेच उपचार घेत असल्यास त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण आटोक्यास येण्यास मदत होते. त्यामुळे दंतरोग तज्ज्ञ बहुतांश रोगांचे निदान करणारा पहिला तज्ज्ञ असतो. हे डॉक्टर मग रुग्णाला संबंधित इतर विषयाच्या वैद्यकीय डॉक्टरांकडून पुढील निदान व उपचारासाठी पाठवतात. त्यामुळे बऱ्याच आजारांची तीव्रता वाढण्यापूर्वीच संबंधित रुग्णावर उपचार सुरू होत असल्याचेही डॉ. पाटील म्हणाल्या.

हेही वाचा – एक लाखापेक्षा जास्त शेतकरी कृषीपंपासाठी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत; महावितरणकडून सर्वाधिक जोडणी दिल्याचा दावा

अशा करा उपाययोजना

  • दररोज न चुकता दिवसातून दोनदा फक्त दोन मिनिटे मुलायम केसांच्या टूथब्रश व तज्ज्ञांनी सांगितलेल्या टूथपेस्टचा वापर करा.
  • दात स्वच्छ करण्यास मंजन दातून झाडांची पाने, तंबाखू, कोळसा इत्यादीचा वापर करणे म्हणजे दातांची झिज करून घेणे होय.
  • लहान मुलांना दात आलेले नसल्यासही त्यांच्या हिरड्या व तोंड मऊ कापसाच्या बोळ्याने अथवा सिलिकाॅन ब्रशच्या सहाय्याने स्वच्छ करा.
  • जेवल्यावर अथवा काहीही खाल्ल्यावर लगेच पाण्याने चूळ भरा, त्याने दातांच्या फटीत अन्नकण साठून राहणार नाही व दुर्गंधी येणार नाही.
  • टूथब्रश शक्यतोवर तीन महिन्यांनी बदलावा. दातांसोबत जिभेच्या स्वच्छतेकडेही लक्ष द्या, जेणेकरून त्यावर अन्नकणांचा थर साचून तोंडाची दुर्गंधी येणार नाही.
  • खराब दात काढल्याने डोळ्यांवर परिणाम होतो, हा गैरसमज आहे. उलट खराब दात न काढल्यास रुग्णाचा त्रास वाढण्यासह इतर आजारांना आमंत्रण मिळते.
  • वयाची १०-१२ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही दात वेडेवाकडे असल्यास दात स्वच्छ करण्यास अडथळा येत असल्यास दंतरोग तज्ज्ञाचा सल्ला घ्या.
  • तोंडात येणाऱ्या पांढऱ्या-लाल चट्ट्यांकडे दुर्लक्ष करू नका. ते मुखपूर्व कर्करोगाचे लक्षण असू शकतात. त्यामुळे या रुग्णांनी वेळीच दंतरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
  • मधुमेहग्रस्तांनी मौखिक आरोग्याची जास्त काळजी घ्यावी, या रुग्णांमध्ये दुर्गंधी व हिरड्यांच्या समस्या तीव्र असण्याची शक्यता जास्त आहे.
  • रुग्ण कडूलिंबाची पाने, हळद, लवंग, एलोवेरा, तुळस इत्यादी पदार्थांनी युक्त द्रव्ये व मलमचा वापर करू शकतात, परंतु हा उपचार तात्पुरता आराम देतो.
  • मुलांना चाॅकलेट खाल्ल्यानंतर दात स्वच्छ करायला लावा. दातांना कीड ही गोड पदार्थ खाल्ल्याने नाही तर चिकट पदार्थ दातांमध्ये दीर्घकाळ अडकून बसल्याने लागते.
  • तंबाखू, मद्यपान, सुपारी, सोडा, कार्बोनेटेड द्रव्य हे आरोग्याला हानिकारक असून त्याचे सेवन टाळा. तर आहारात पौष्टिक पदार्थ जसे पालेभाज्या अंकुरित कडधान्य, फळे यांचे सेवन करा.
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tooth decay those with gum disease have an increased risk of heart disease observation of department of dentistry in medical hospital nagpur mnb 82 ssb
Show comments