अमरावती : जादूटोण्याच्या संशयावरून मेळघाटातील रेट्याखेडा या गावातील एका ७७ वर्षीय वृद्ध महिलेला बेदम मारहाण करून तिची धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार चिखलदरा तालुक्यातील रेट्याखेडा येथे उघडकीस आला आहे. या महिलेच्या गळ्यात चपलांचा हार घालून गावातून फिरवण्यात आले. तिच्या अंगाला गरम सळाखीचे चटकेही देण्यात आले. काही दिवसांपुर्वी अमरावतीत जातपंचायतीच्‍या आदेशाचे पालन केले नाही, म्‍हणून महिलेसह तिच्‍या कुटुंबाला बहिष्‍कृत करण्‍यात आल्‍याचा प्रकार उघडकीस आला होता. त्‍यातच आता ही नवीन घटना समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेळघाटातील अमानुष छळाची घटना गेल्‍या ३० डिसेंबर रोजी घडली. पीडित वृद्ध महिलेचा मुलगा आणि सून हे रोजगारासाठी गावापासून दूर राहतात. ४ जानेवारी रोजी त्यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर काल शुक्रवारी पीडित महिलेने कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालय गाठून तक्रार दाखल केली. त्यानंतर तिच्यावरील अत्याचाराला वाचा फुटली. पोलिसांत तक्रार दाखल करूनही न्याय न मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागले, असे पीडित महिलेच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>>राष्ट्रीय संशोधन संस्था ‘व्हीएनआयटी’ने तयार केले नक्षत्र यंत्र…

ही वृद्ध महिला ३० डिसेंबरला रेट्याखेडा येथील तिच्या घरात एकटीच होती. ती पहाटे घराबाहेर आल्यानंतर शेजारी राहणाऱ्या दाम्पत्याने तिला पकडून ठेवले. पीडित वृद्ध महिला आमच्या घराच्या आजूबाजूला जादूटोणा करीत असल्याचा आरोप या दाम्पत्याने केला. त्यानंतर एका व्यक्तीने तिला काठीने मारहाण केली. इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तिच्या डोक्यावर गाठोडे ठेवून तिची गावातून धिंड काढण्यात आली. नंतर गावातून बाहेर काढण्यात आले. या प्रकरणामध्ये गावातील पोलीस पाटील देखील सहभागी झाला होता. या दरम्यान पीडित महिलेचा अमानुष छळ करण्यात आला. तिला गरम सळाखीने चटके देण्यात आले, असे तक्रारीत नमूद आहे.

पीडित महिलेसह तिचा मुलगा, सून यांनी शुक्रवारी अमरावती गाठून जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली. या तक्रारीची प्रत राज्य महिला आयोग, पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक आणि धारणीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली आहे. अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितले आहे.

राज्य सरकारने २०१३ साली जादूटोणा, अघोरी कृती, नरबळी आणि काळी जादू याच्या विरोधात कायदा संमत केला. या कायद्यात १२ कलमे आहेत. तरीही या घटना थांबलेल्या नाहीत. अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचे सगळ्यांत जास्त शोषण होते, हे दिसून आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Torture of an old woman on suspicion of superstition melghat in amravati news mma 73 amy