लोकसत्ता टीम
अमरावती: विभागीय मुख्यालय असलेल्या अमरावती शहरात तीन रेल्वे स्थानके असली, तरी रेल्वेसेवा अपुरीच असल्याचे चित्र आहे. बडनेरा रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या तब्बल ९ गाड्या बडनेरा रेल्वेस्थानकावर थांबत नाहीत. या गाड्यांना थांबा देण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई ते हावडा या रेल्वेमार्गावरील बडनेरा हे महत्त्त्वाचे रेल्वे स्थानक. या रेल्वे स्थानकावरून १८ ते २० रेल्वेगाड्या दररोज धावतात.
अमरावती रेल्वे स्थानकावरून सध्या चार एक्स्प्रेस गाड्या आणि दोन मेमू ट्रेन सुटतात. नरखेडला जोडणाऱ्या नवी अमरावती या रेल्वे स्थानकावरूनही तीन गाड्या धावतात. तरीही हजारो अमरावतीकरांचा रेल्वे प्रवास खडतर बनला आहे.
बडनेरा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर हावडा ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या तब्बल नऊ रेल्वेगाड्या थांबत नाहीत. त्यात कामाख्या-लोकमान्य टिळक टर्मिनस कर्मभूमी, टाटानगर अंत्योदय, पुरी-सुरत, हावडा-सीएसएमटी दुरांतो, भुवनेश्वर-लोकमान्य टिळक टर्मिनस, पुरी-गांधीधाम, पुरी-लोकमान्य टिळक टर्मिनस, हावडा-पुणे दुरांतो, हावडा-शिर्डी, या एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. यातील काही रेल्वेगाड्या या वर्धा, अकोला या ठिकाणी थांबतात; पण बडनेरा स्थानकाला तेही भाग्य मिळू नये, ही शोकांतिका असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
चार गाड्यांना थांबा देण्याची मागणी
अमरावती-बडनेरा शहर हे अतिशय वर्दळीचे ठिकाण आहे. वैद्यकीय, शिक्षण, औद्योगिक, पर्यटन, प्रशासकीय यासह विविध क्षेत्रातील प्रवाशांची या ठिकाणी मोठी वर्दळ असते. मात्र रेल्वेने या ठिकाणावरून प्रवास करण्यासाठी पुरेशा प्रमाणात गाड्यांची उपलब्धता नाही. ही बाब लक्षात घेता प्रवाशांच्या सुविधेकरिता पुरी-सूरत साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस, हावड़ा-मुंबई सीएसएमटी दुरांतो एक्सप्रेस , हावडा-पुणे दुरांतो एक्स्प्रेस, व हावडा-साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्स्प्रेस, या चार महत्त्वपूर्ण गाड्यांना बडनेरा स्थानकावर थांबा देण्याची मागणी राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.