अमरावती : वापरलेल्या विजेचे पैसे वेळेवर भरण्यास ग्राहकांकडून टाळाटाळ होत असल्याने महावितरणच्या अमरावती परिमंडळाची एकूण थकबाकी २४८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तथापि, या आर्थिक वर्षातील मार्च हा शेवटचा महिना असूनही गेल्या ९ दिवसात फक्त २९ कोटी रूपयेच वसूल झाले आहे. त्यामुळे उर्वरित थकबाकी वसुलीकरीता परिमंडळात ‘मिशन २१ डे’ ला सुरूवात करण्यात आली असून मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात विभाग निहाय उद्दिष्ट ठरवून देण्यात आले असून क्षेत्रीय पातळीवर होणाऱ्या कारवाईचा दररोज आढावा घेण्यात येत आहे़.
अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्या अंतर्गत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांकडील २१९ कोटी रूपयाच्या वीज देयकाच्या थकबाकीच्या वसुलीसाठी ‘मिशन २१ डे’ अंतर्गत ‘थकित वीज बिल भरा अथवा वीज पुरवठा खंडित’ ही मोहीम तीव्र करण्यात आली आहे.
वीज पुरवठा खंडित होणार
३१ मार्च पर्यंत २१९ कोटी रूपये वसूल करण्यासाठी दरदिवशी अंदाजे १० कोटी रूपये वसुल करावे लागणार आहेत. त्यामुळे वीजबिल भरण्याला प्रतिसाद न देणाऱ्या ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित होणार आहे. संपूर्ण वीजबिल आणि पुन र्जोडणी शुल्क (सिंगल फेज ग्राहक ३१० रूपये आणि ३ फेज ग्राहक ५२० रूपये अधिक जी.एस.टी.) भरल्याशिवाय त्या ग्राहकाचा वीज पुरवठा सुरु न करण्याचे निर्देश मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांनी दिले आहेत.
‘मिशन २१ डे’ अंतर्गत अमरावती जिल्ह्यातून १०३ कोटी रुपये आणि यवतमाळ जिल्ह्यातून ११५ कोटी रूपये इतक्या थकबाकीची वसुली करावी लागणार आहे. त्यासाठी मुख्य अभियंत्यासोबत अधीक्षक अभियंता अमरावती दीपक देवहाते आणि अधीक्षक अभियंता यवतमाळ प्रवीण दरोली ठिक-ठिकाणी अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत वसुली मोहिमेत सहभागी होत आहेत.
सार्वजनिक सुट्टीत सुरू राहणार वीज बिल भरणा केंद्रे
महावितरण चे कर्मचारी वीजबिल वसुलीसाठी ग्राहकांच्या दारात पोहोचत आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरणची वीजबिल भरणा केंद्रे कार्यालयीन वेळेत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहेत. तसेच ग्राहकांना महावितरण मोबाइल ॲप, महावितरण संकेतस्थळ यासोबत ऑनलाइन वीजबिल भरण्याचे सर्व पर्याय/सोय उपलब्ध आहे. आपले वीज देयक वेळेवर भरून महावितरणला सहकार्य कराव, असे आवाहन वीज ग्राहकांना करण्यात आले आहे.