नागपूर : रेल्वे भरती मंडळाने (आरआरबी) ‘सिनिअर पब्लिसिटी इन्स्पेक्टर’ पदासाठी जाहिरात दिली आहे. मात्र, जाचक शैक्षणिक अटीमुळे उच्चशिक्षित शेकडो उमेदवार या पदभरतीपासून वंचित राहण्याची भीती आहे.
हे पद वर्ग ३ दर्जाचे असून त्यासाठी केवळ जनसंवाद पदविकाधारक पात्र आहेत. पत्रकारिता किंवा जनसंवाद पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांना संधी नाही. देशातील सर्व रेल्वे भरती मंडळांनी विविध पदभरतीसाठी एकत्रित जाहिरात ७ जानेवारी २०२५ प्रकाशित केली. मुंबई, बंगळुरू, भोपाळ, सिकंदराबाद, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता यासह २० रेल्वे बोर्डात १ हजार ३६ पदे भरली जाणार आहेत. यामध्ये शिक्षण, पर्यवेक्षक, मुख्य विधि सहायक, शारीरिक शिक्षण प्रशिक्षक, ‘सिनिअर पब्लिसिटी इन्स्पेक्टर, कर्मचारी कल्याण अधिकारी, प्रयोगशाळा सहायक या पदांचा समावेश आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज मागावण्यात आले आहेत. सिनिअर पब्लिसिटी इन्स्पेक्टरची तीन पदे भरण्यात येणार आहेत. या पदाकरिता शैक्षणिक पात्रता जनसंवाद पदविका किंवा पत्रकारिता पदविका अशी आहे. महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांमध्ये जनसंवाद, पत्रकारिता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. ऑनलाईन अर्जात मात्र केवळ पदविका अभ्यासक्रम हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे पदवी, पदव्युत्तर उमेदवारांना अर्ज करण्यात अडचण येत आहे.
यासंदर्भात मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनाही ही तांत्रिक चूक लक्षात आली. उमेदवारांनी अर्ज भरताना पदविका हा पर्याय निवडावा व त्यांच्याकडे असलेले अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र अपलोड करावे, अशी सूचना त्यांनी केली. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल डी. निला यांनी हा मुद्दा संबंधित यंत्रणेच्या लक्षात आणून दिला जाईल, असे सांगितले.
‘लोकसत्ता’च्या बातमीनंतर सुधारणा
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) माहिती उपसंचालक पदासाठी जाहिरात दिली होती. त्यात शैक्षणिक पात्रता पत्रकारिता किंवा जनसंवाद पदवी अशी होती. त्यात पदव्युत्तरचा पर्याय नव्हता. याबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्त दिल्यानंतर त्यात सुधारणा करण्यात आली, असे ‘सिनिअर पब्लिसिटी इन्स्पेक्टर’ या पदासाठी अर्ज करणाऱ्या एका उमेदवाराने सांगितले.