अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघातील प्रचार तोफा थंडावल्यानंतर आता उमेदवारांचा छुप्या व अंतर्गत प्रचारावर जोर आहे. तिरंगी लढतीत कोण बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून उमेदवारांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात यावेळेस अत्यंत चुरशीची लढत आहे. निवडणूक रिंगणात १५ उमेदवार असले तरी परंपरेनुसार तिहेरी लढत होत आहे. भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील व वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये अटीतटीचा सामना आहे. यंदा दोन प्रमुख उमेदवार मराठा समाजाचे असल्याने मोठ्या प्रमाणावर मतविभाजन होईल. जातीय राजकारण व मविभाजनाचे गणित महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रचारात मतदारसंघातील अनेक प्रश्न व समस्यांवरून आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू होते. निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय चर्चाचे फड रंगात आले.
प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात भेटीगाठी, मेळावे, कॉर्नर सभा, बैठकांचा धडाका सुरू होता. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात जाहीर सभांमधून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजप नेत्यांनी जाहीर सभा घेतल्या. काँग्रेस उमेदवार डॉ. पाटील यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रचारसभांमधून भाजपला लक्ष केले. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रचार सभांमध्ये मतजोडणी केली. गेल्या महिन्याभरात उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढत अधिकाधिक मतदारांना साद घातली. जाहीर प्रचारात नेत्यांनी एकमेकांवर टीकेची तोफ देखील डागली होती. गेल्या दोन आठवड्यापासून धडाडणाऱ्या प्रचारतोफा आता थांबल्या आहेत. मतदानापर्यंत छुपा व अंतर्गत प्रचार केला जाणार आहे. मतदारराजा कुणाला कौल देतो, हे ४ जूनलाच स्पष्ट होईल.
मतदारसंघातील मुद्दे व प्रश्न राहिले केंद्रस्थानी
अनुप धोत्रे यांनी आपल्या प्रचारात मतदारसंघात करण्यात आलेली रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, उड्डाणपूल, रेल्वेस्थानकाचा विकास, अकोला-अकोट रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेज, इतर विकास कामे, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी लाभ आदी मुद्द्यांवरून जोर दिला. काँग्रेस व वंचित आघाडीकडून मतदारसंघातील विविध प्रश्न व समस्यांवरून भाजपला घेरले होते. बेरोजगारी, उद्योग-व्यवसायांचा अभाव, शिवणी विमानतळ, कृषी प्रक्रिया उद्योग, पाणीपुरवठा, खारपाणपट्ट्यातील समस्या, अकोला-अकोट मार्ग आदी मुद्दे प्रचारात केंद्रस्थानी होते.