साडेपाच हजार पथदिवे बंद
गणेशोत्सवाला आठ दिवस झाले. आता विसर्जनाचे वेध लागले आहेत. वाजत-गाजत रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुकी काढण्याची शहरात परंपरा आहे. मात्र यंदा रात्रीला विसर्जन मिरवणूक काढायची असेल तर सावधान. कारण शहरातील प्रमुख मार्गावरील तब्बल साडेपाच हजार पथदिवे बंद आहेत. ही आकडेवारी खुद्द महापालिकेनेच दिली असली तरी प्रत्यक्षात ही संख्या दुप्पट असण्याचीच शक्यता अधिक आहे. पुढील तीन दिवसात ते सुरू होण्याबाबतही शंकाच आहे.
नागपुरात गणेशोत्सवाचा उत्साह दहा दिवसांत शिगेला पोहोचलेला असतो. श्रींची प्रतिष्ठापना ज्या पद्धतीने वाजत गाजत होते. त्याही पेक्षा मोठय़ा मिरवणुका विसर्जनाच्या दिवशी काढल्या जातात. मोठय़ा सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुका साधारणपणे रात्रीच सुरु होतात. यात रस्त्यावरील खड्डयांचे विघ्न असते तसेच ते पथदिव्यांचेही असते. दरवर्षी गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर खड्डय़ांचा विषय ऐरणीवर येतो. पालकमंत्री बैठक घेऊन तातडीने खड्डे बुजवण्याचे आदेश देतात. निविदा काढायला आठ दिवसांचा वेळ जातो प्रत्यक्षात कामे सुरू होईपर्यंत गणेशोत्सव संपलेला असतो. पथदिव्यांचेही असेच. विसर्जनाला चार दिवस उरले असताना महापालिकेला जाग येते. त्यानंतर पथदिव्यांचा प्रश्न पुढे येतो. महापालिका बैठक घेऊन विसर्जनाच्या दिवसापर्यंत पथदिवे सुरू करण्याचे आदेश वीज शाखेला देते. यंदाही हेच झाले आहे. मंगळवारी महापालिकेत याबाबत बैठक झाली. बंद दिवे सुरू करण्याचे आदेशही बजावण्यात आले. मात्र या निमित्ताने बंद पथदिव्यांचे जे आकडे पुढे आले त्यावरून शहर किती अंधारात आहे याची प्रचिती आली.
महापालिकेच्या एकूण दहा झोनमध्ये ५६३९ पथदिवे बंद आहेत. यापैकी २२५४ एलईडी तर ३३८५ साधारण दिवे आहेत. धरमपेठ, लक्ष्मीनगर भागातीतील १३००, हनुमान नगर, धंतोली भागातील ५००, नेहरूनगर, गांधीबाग या परिसरांतील वस्त्यांमधील ६५०, सतरंजीपुरा , लकडगंज भागातील वस्त्यांमधील ११०० आणि आशीनगर व मंगळवारी भागातील १२०० पथदिव्यांचा यात समावेश आहे. यावरून रस्त्यावरील अंधाराची कल्पना येते. या परिस्थितीत रात्रीच्या गणेश विसर्जनाचा प्रवास खडतर ठरू शकतो.
मिरवणुकीत लहान मुलांपासून तरुण, तरुणी आणि ज्येष्ठ नागरिकांचाही मोठय़ा प्रमाणात सहभाग असतो. अंधारात रस्त्यावरील खड्डे दिसत नाही. नाचता नाचता एखाद्याचा पाय खड्डय़ात गेला तर तो मोडल्याशिवाय राहणार नाही इतके हे खड्डे खोल असतात.
महापालिकेने विसर्जनापूर्वी पथदिवे सुरू करण्याचे आदेश दिले असले तरी आता दोनच दिवस शिल्लक आहे. इतक्या कमी वेळेत हे काम होणे अशक्य आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी रात्रीच्या वेळी विसर्जनाचा बेत आखला असेल तर भक्तांच्या सुरक्षेचा विचार करून त्याबाबत पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा