नागपूर : महाराष्ट्रात पहिल्यांदाच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात गवताळ सफारी सुरू करण्यात येत आहे. बारामती आणि इंदापूर तालुक्यात तो सुरू होण्याची शक्यता आहे. पुणे वनविभागाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. मंगळवारी, १७ ऑक्टोबरला या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. नागरिकांसाठी येत्या १८ ऑक्टोबरपासून सफारी नोंदणी सुरू होत आहे. यासंदर्भात वनविभागाने एक ‘ऑनलाइन बुकिंग अॅप’ विकसित केले आहे.
पुणे आणि सोलापूरच्या आसपासच्या भागात अनेक प्राणी आणि पक्षी दिसतात. वनविभागाने गावकरी आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांना बरोबर घेऊन परिसरातील वन विकासासाठी पर्यटन आराखडा तयार केला आहे. स्थानिक ग्रामस्थांना वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी प्रशिक्षण व्यवस्थापन कौशल्ये आणि पर्यटक मार्गदर्शक देण्यात आले आहेत. गवताळ प्रदेशाचे व्यवस्थापन हादेखील या सफारीमागील एक उद्देश आहे. या उपक्रमाचा उद्देश परिसरात रोजगार वाढवणे, संवर्धन कार्यक्रमात नागरिकांचा सहभाग वाढवणे हादेखील आहे.
हे हरित क्षेत्र काळवीट, चिंकारा, ससा, लांडगा, कोल्हा, हायना यासारख्या तृणभक्षी व मांसभक्षी प्राण्यांसाठी महत्त्वाचे आहे. इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी आणि बारामती तालुक्यातील शिर्सुफळ या दोन ठिकाणांपासून गवताळ सफारीला सुरुवात होत आहे. प्रादेशिक वनक्षेत्रात आम्ही ही गवताळ प्रदेश सफारी सुरू केली आहे. या सफारीसाठी लागणारी वाहने लवकरच उपलब्ध होतील. पण सध्या आम्ही पर्यटकांना त्यांच्या वाहनातून या सफारीसाठी प्रवेश देणार आहोत, असे पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते म्हणाले.