नागपूर : ‘त्या’ दोघींना जंगलात सोडले तेव्हा ‘त्या’ हा नवा अधिवास स्वीकारतील की नाही, अशीच शंका होती, पण आठवडाभरातच त्यांनी हा अधिवास स्वीकारला आणि आता अगदी सहजपणे ‘त्या’ पर्यटकांसमोर येत आहेत. ब्रम्हपुरी वनक्षेत्रातून नवेगाव-नागझिरा वनक्षेत्रात स्थानांतरित करण्यात आलेल्या दोन वाघिणींपैकी एक पर्यटनादरम्यान मुंबई येथील वन्यजीवप्रेमी व एअर इंडियासाठी सहपायलट म्हणून काम करणारे राजस कर्णिक यांना दिसली. स्थानांतरित करण्यात आलेल्या वाघिणीला पर्यटनादरम्यान पाहणारे ते पहिले पर्यटक ठरले.
हेही वाचा >>> बेपत्ता मुली शोधण्यात नागपूर पोलीस अव्वल; पाच वर्षांत ८८८२ बेपत्ता; ८५०१ मुलींचा शोध
नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्प म्हणजे भारतातील सर्वोत्कृष्ट जंगलांपैकी एक. अगदी अलीकडच्या काही वर्षांपर्यंत हे जंगल वीजेपासूनच काय तर सौरविजेपासूनही कोसो दूर होते. त्यामुळे रात्रीच्यावेळी या जंगलाचे सौंदर्य न्याहाळण्याचा अनुभव काही वेगळाच. या जंगलात वाघांची संख्याही चांगलीच आणि इथला वाघही राजबिंडा. त्यामुळे पर्यटकांचा ओढा कायम या जंगलाकडेच. दरम्यानच्या काळात या जंगलातील तृणभक्षी प्राण्यांचे खाद्य कमी झाले आणि परिणामी त्यांची संख्याही कमी झाली.
नैसर्गिक पाणवठेही जवळजवळ नाहीसे झाले. त्यामुळे साहजीकच इथल्या वाघांनीही आपला मोर्चा दुसरीकडे वळवला. भारतातील सर्वोत्कृष्ट जंगलापैकी एक असणाऱ्या या जंगलाला पुन्हा त्याचे मूळ वैभव परत मिळवून देण्यासाठी वनखाते कामाला लागले. ब्रम्हपुरी वनक्षेत्रातील दोन वाघिणींना अवघ्या सहा दिवसांपूर्वी या जंगलात स्थानांतरित करण्यात आले. त्यावेळी या वाघिणी येथे स्थिरावतील का, याबाबत सर्वांनाच शंका होती, पण बुधवारी कर्णिक यांना ‘एनटी-२’ ही वाघीण झुडपात विसावतांना दिसली आणि नंतर तिने रस्ता ओलांडत मार्गक्रमण केले. नागझिराचे जंगल त्यांच्याही आवडीचे आणि येथील नव्या वाघिणीने त्यांनाही निराश न करता मनसोक्त दर्शन दिले.