लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : लोकसंख्येत होणाऱ्या वाढीमुळे आधीच वन्यप्राण्यांचा अधिवास हिरावला जात आहे. त्यात आता विकास प्रकल्प त्यांच्या अधिवासात येत आहे. या सर्व परिस्थितीशी ते जुळवून घेत असताना त्यांच्याच भरवश्यावर पर्यटन करणाऱ्या पर्यटकांनी त्यांना वेठीस धरल्याची बाब उघडकीस आली.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात तीन पर्यटक वाहनांनी वाघांची वाट अडवून धरल्याने बफरमधील या घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील गाभा तसेच बफर क्षेत्रातील व्यवस्थापन उत्कृष्ट असल्यामुळेच पर्यटकांचा वाढता ओघ आहे. गाभा क्षेत्रासोबतच आता बफर क्षेत्रातही सहज व्याघ्रदर्शन होऊ लागल्याने पर्यटक येथेही मोठ्या प्रमाणात वळत आहेत.

आणखी वाचा-तरुणीच्या प्रेमासाठी प्रियकर बनला तोतया सैन्यअधिकारी, डाव्या हाताने ‘सॅल्यूट’ केला अन्…

भानूसखिंडी, छोटा मटका, बबली यासारखे पर्यटकांनी नाव दिलेले वाघ आणि त्याच्या बछड्यांनी पर्यटकांना लळा लावला आहे. याच बफर क्षेत्रात रामदेगी या परिसरात मंदीर तसेच बौद्ध विहार असल्याने भाविक तसेच अनुयायी यांचा वावरसुद्धा आहे. त्यामुळे एकीकडे व्याघ्रदर्शनासाठी होणारी सफारी आणि दुसरीकडे भाविक तसेच अनुयायी यांना सांभाळणे ही तारेवरची कसरत आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्राचे तत्कालीन उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी ही तारेवरील कसरत अतिशय उत्कृष्टरित्या सांभाळली. त्यांच्या उत्तम व्यवस्थापनामुळे त्यांच्या कार्यकाळात कधी व्याघ्रसंवर्धनात अडथळा आला नाही. मात्र, अलीकडच्या काळात या बफर क्षेत्रात अनेक घटना उघडकीस येत आहे.

आणखी वाचा-मंत्री धर्मराव आत्राम म्हणतात, ‘शरद पवार थकले आहेत त्यांनी…’

अलीकडच्या काही दिवसांमध्ये वाघांच्या तोंडी कधी रबरी बूट, कधी प्लास्टिक बॉटल तर कधी कापड पाहीले गेले. तर आता पर्यटनसुद्धा अनियंत्रित झाल्याचे दिसून येत आहे. सोमवारी या व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील रामदेगी मंदिर परिसरात पर्यटक वाहने अनियंत्रित आणि बेजबाबदारपणे वाहने चालवत वाघाची वाट अडवत असल्याचे आढळून आले. मंदिर परिसरातील काही भाविकांनी हा प्रकार त्यांच्या डोळ्यांनी पाहिला. पर्यटक वाहनांसाठी जे नियम घालून दिले आहेत, त्या नियम धाब्यावर बसवून वाहने मागेपुढे नेली जात होती. त्यामुळे या वाघालाही त्याच्या नैसर्गिक अधिवासातून मार्गक्रमण करणे कठीण होऊन गेल्याचे दिसून आले. खडसंगी वनपरिक्षेत्रातील निमढेला उपक्षेत्रातील या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tourist vehicles blocked the path of the tiger in the tadoba andhari tiger project buffer zone rgc 76 mrj