नागपूर : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याला खरी ओळख मिळवून दिली ती ‘जय’ या वाघाने. नागझिरा अभयारण्यातून नैसर्गिक स्थलांतर करुन आलेला हा वाघ नंतर कधी उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याचा झाला ते कळलेच नाही. कधी राष्ट्रीय महामार्गावर, कधी नद्या ओलांडणाऱ्या ‘जय’ ला पाहण्यासाठी सामान्य पर्यटकांपासून तर ‘सेलिब्रिटी’ अशी सर्वांचीच गर्दी असायची. मात्र, ‘जय’ गेला आणि पर्यटकांनी या अभयारण्याकडे पाठ फिरवली. त्यानंतर ‘फेअरी’ ही वाघीण आणि तिच्या पाच बछड्यांनी पर्यटकांना आकर्षित केले. त्यानंतर पुन्हा पर्यटकांनी पाठ फिरवली. आता ‘एफ-२’ नावाची वाघीणसुद्धा तिच्या पाच बछड्यांसह पर्यटकांना आकर्षित करत आहे, पण पर्यटकांनी पर्यटनाचा अतिरेक करत चक्क वाघाचाच रस्ता अडवण्याचा प्रकार या अभयारण्यात समोर आला आहे.
उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील गोठणगाव प्रवेशद्वाराजवळ ‘एफ-२’ वाघीण आणि तिचे पाच बछडे पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय ठरले आहेत. उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील गोठणगाव प्रवेशद्वाराजवळ ते पर्यटकांना भुरळ घालत आहेत. त्यांचे छायाचित्र घेण्यासाठी जंगल सफारीवर असलेल्या पर्यटकांच्या जिप्सीने समोरून व मागून घेरले होते. याचा व्हिडिओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणात जिप्सीचे चार चालक व चार पर्यटक मार्गदर्शक यांना सात दिवसांसाठी निलंबित केले आहे. तर जिप्सी चालकांवर अडीच हजार व गाईडला ४५० रुपये प्रति व्यक्ती दंड लावण्यात आला आहे.
मंगळवारी या जिप्सी चालकांनी व पर्यटक मार्गदर्शकांनी गोठणगाव तलावाजवळ वाघीण व तिच्या पाच बछड्यांसह जात असताना रस्त्यावर बराच वेळ घेरून ठेवले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्यामुळं पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक व उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्याचे प्रभारी डॉ. प्रभूनाथ शुक्ला यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी आरती उईके यांना चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर अभयारण्य प्रशासनानं ही कारवाई केली आहे.
उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील गोठणगाव प्रवेशद्वाराजवळ ‘एफ-२’ वाघीण आणि तिचे पाच बछडे पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय ठरले आहेत. गोठणगाव प्रवेशद्वाराजवळ ते पर्यटकांना भुरळ घालत आहेत. त्यांचे छायाचित्र घेण्यासाठी जंगल सफारीवर असलेल्या पर्यटकांच्या जिप्सीने समोरून व मागून घेरले होते pic.twitter.com/Cmcrhl2SRk
— LoksattaLive (@LoksattaLive) January 4, 2025
हेही वाचा – VIDEO : अवैध वाळू व सुपारी तस्करांवर आमदाराकडून छापा, नागपुरातील केळवद परिसरात…
नियम काय आहे?
वाघापासून वाहने ३० मीटर दूर असणे गरजेचे आहे. पेंच, ताडोबा व अन्य व्याघ्र प्रकल्पासह अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची गती, वाहने कुठे थांबतात, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक ॲप बनविण्यात आला आहे. जर नियमांचे उल्लंघन होत असेल तर गुन्हा नोंदविला जातो. जंगलांमध्ये वाघाजवळून कुठलेही वाहन ३० मीटर दूर असले पाहिजे. वाघाच्या मागेपुढे वाहने उभी करणे हे चुकीचे आहे.