यवतमाळ : हमखास व्याघ्र दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यात वाघ फासांमध्ये अडकण्याच्या घटना सातत्याने घडत आहे. यापूर्वी पीसी वाघीण आणि टी ९ वाघिणीच्या गळ्यात फास अडकला होता. या दोघींची फासातून सुखरूप सुटका होऊन आठवडा उलटत नाही, तर आता पर्यटकांची आवडती वाघीण ‘सितारा’च्या पायात फास अडकल्याचे आढळून आले. त्यामुळे वन्यजीव प्रेमींमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
टिपेश्वर अभयारण्यात बुधवारी सकाळी सफारी करत असताना एका पर्यटकाने काढलेल्या छायाचित्रात सितारा वाघिणीच्या पायात तारेचा फास असल्याचे स्पष्ट दिसले. ही माहिती वन्यजीव विभागाला देण्यात आली. गेल्या महिनाभरात पायात फास अडकलेली टिपेश्वरमधील ही तिसरी वाघीण आहे. यापूर्वी टिपेश्वर अभयारण्यात पीसी वाघिणीच्या गळ्यात फास अडकला होता. त्यानंतर मुकुटबन वनपरिक्षेत्रातील पवनार परिसरात टी-९ वाघिणीच्या गळ्यात फास अडकल्याचे आढळले होते.
तब्बल २५ दिवस शोधमोहीम राबविल्यानंतर पीसी वाघिणीला जेरबंद करून तिच्या गळ्यातील फास काढण्यात आला. आठवडाभरापूर्वीच पीसी वाघिणीला उपचार करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. अधिकाऱ्यांच्या श्रेयवादात ही शोधमोहीम महिनाभर चालल्याची चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वीच टी-९ वाघिणीच्या गळ्यातील फास निघाल्याचे आणि तिची जखम सुकल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यात दिसून आल्याने तिला ट्रन्क्युलाईज करण्याची मोहीम थांबविण्यात आली.
आता बुधवारी टिपेश्वर अभयारण्यातील सितारा वाघिणीच्या पायात फास अडकल्याची बाब उघड झाली. त्यामुळे आता या वाघिणीस ट्रॅप करण्यासाठी कॅमेरे लावण्यात येऊन तिची शोधमोहीम वन विभागाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. सोमवारी १० मार्च रोजी पर्यटकांना सितारा वाघिणीने दर्शन दिले. त्यावेळी तिच्या पायात कोणत्याही प्रकारचा फास दिसून आला नाही. मंगळवारी टिपेश्वर अभयारण्य पर्यटकांसाठी बंद असते. १२ मार्चला सकाळच्या सफारीदरम्यान एका पर्यटकाने घेतलेल्या छायाचित्रात सितारा वाघिणीच्या समोरील पायाला तारेचा फास असल्याचे दिसून आले. सितारा वाघीण दीड वर्षाची आहे. आर्ची नामक वाघिणीने तिला जन्म दिला आहे. सितारा वाघिणीच्या पायात फास अडकला असला तरी तिला कोणत्याही प्रकारची जखम आढळून आली नाही. वनविभाग आता तिच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहे.
अलीकडच्या काही दिवसांत टिपेश्वर अभयारण्यातील वाघांना फास लागण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. शिवाय लहानमोठ्या अनेक वन्यजिवांची येथे शिकार होत असल्याची शंका या घटनांमुळे व्यक्त होत आहे. टिपेश्वर वन्यजीव विभागाच्या निष्काळजीपणाबद्दल पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, सितारा वाघिणीच्या हालचालीवर वनविभाग सध्या लक्ष ठेवून आहे. तिला लवकरात लवकर ट्रंक्यूलाइज करून पायातील फासातून मुक्त करण्यात येईल, अशी माहिती विभागीय वन अधिकारी, उत्तम फड (वन्यजीव विभाग पांढरकवडा) यांनी दिली.
© The Indian Express (P) Ltd