अकोला: रस्ता, महामार्ग खराब राहिल्याने अपघात होऊन प्रवाशांचे जीव गेल्याचे आपण नेहमीच ऐकतो. महामार्ग खराब असल्याने जीव वाचला, हे वाचल्यावर विश्वास बसणार नाही. मात्र, हे सत्य आहे. अकोल्यातील पर्यटकांच्या बाबतीत ते घडले. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीनगर येथे ‘हाऊस बोटी’च्या सहाय्याने भीती, चिंतेच्या वातावरणात दिवस काढणारे अकोल्यातील पर्यटक शनिवारी सायंकाळी अकोल्यात दाखल झाले.

जन्म व कर्मभूमीत पाय ठेवताच पर्यटकांचे अश्रू अनावर झाले. ‘आम्ही पहलगामलाच निघालो होतो. मात्र, जम्मूचा महामार्ग खराब असल्याने आमच्या नियोजनात बदल झाला. अन्यथा आम्ही पण हल्ल्याच्या वेळी पहलगाममध्येच असतो. काळ आला होता, पण वेळ आली नव्हते,’ अशा शब्दात काश्मीरमधून सुखरूप परतलेल्या पर्यटकांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

गुरुमाऊली टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून अंबादास सप्रे व पंकज साहू यांच्यासोबत अकोल्यातील ३१ पर्यटक जम्मू काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते. मंगळवारी ते पहलगाम येथे जाणार होते. मात्र, पहलगाम येथे जाण्यापूर्वीच त्या ठिकाणच्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यांमध्ये अनेक पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या दहशतवादी हल्ल्याची माहिती अकोल्यातील पर्यटकांना मिळाली. पहलगाम येथे जाण्यापासून त्यांना वेळीच रोखण्यात आले. त्यामुळे हे सर्व पर्यटक सोनमर्ग येथून श्रीनगर येथे दाखल झाले.

दोन दिवस त्यांनी श्रीनगर येथे ‘हाऊस बोट’ मध्ये वास्तव्य केले. दरम्यान, काश्मीरातील महाराष्ट्राच्या पर्यटकांना परत आणण्यासाठी मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र सदनातील कक्ष अशी त्रिस्तरीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. काश्मीरमधून येणाऱ्या विशेष विमानातून अकोल्यातील ३१ पर्यटकांना आणण्यात आले. मुंबई येथे विशेष विमानाने दाखल झालेले सर्व पर्यटक बसने शनिवारी अकोल्यात आले आहेत.

मोठ्या संकट व अडचणीचा सामना करून पर्यटक आपल्या गावी परतले आहेत. काश्मीरमधून अकोल्यात आलेल्या पर्यटकांचे भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, माजी महापौर विजय अग्रवाल, महानगराध्यक्ष जयंत मसने आदींनी स्वागत केले. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील पर्यटकांचे स्वागत केले.

दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरमध्ये आलेल्या थरारक अनुभवाचे पर्यटकांनी कथन केले. या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून अकोल्यात सुखरुप परतण्यासाठी राज्य शासनासह अनेकांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे देखील पर्यटकांनी यावेळी सांगितले.