नागपूर : पेंच व्याघ्रप्रकल्पात सहजासहजी वाघ दिसून येत नाही. मात्र, पेंच व्याघ्रप्रकल्पातील सात आणि उमरेड-पवनी-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्यात तीन अशा एकूण दहा वनपरिक्षेत्रात २२ व २३ मे रेाजी ‘निसर्गानुभव’आयोजित करण्यात आला. यात सहभागी पर्यटकांना वाघ आणि बिबट्यांसह चांदी अस्वलाचे दर्शन झाले. पेंच व्याघ्र प्रकल्पातील पाच गाभा वनपरिक्षेत्रात क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या वतीने तर पवनी आणि नागलवाडी या दोन बफर वनपरिक्षेत्रात आणि उमरेड-पवनी-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्यातील तीन वनपरिक्षेत्रात वन्यजीव प्रेमी आणि क्षेत्रीय कर्मचारी यांच्या साहाय्याने निरीक्षणे नोंदवण्यात आली. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पवनी आणि नागलवाडी वन परिक्षेत्रात ३७ तर उमरेड-पवनी-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्यातील उमरेड, पवनी आणि कुही या वनपरिक्षेत्रात ३४ अश्या एकूण ७१ तात्पुरत्या लाकडी मचाण निसर्गानुभवसाठी तयार करण्यात आल्या. सहभागींना मचाणावरच रात्रीचे जेवण पुरविण्यात आले. याशिवाय त्यांना टी-शर्ट आणि कॅप देण्यात आल्या.
हेही वाचा >>> नागपूर : बहुप्रतीक्षित रामझुला अपघात प्रकरणाचा निर्णय आला; न्यायालयाने आरोपीचा जामीन…
आकस्मिक परिस्थिती हाताळण्यासाठी वैद्यकीय चमू आणि रुग्णवाहिका यांची देखील सोय करण्यात आली. या कार्यक्रमात पेंचमध्ये एकूण २ हजार ६९८ प्राणी आढळून आले. त्यापैकी २ हजार ३८० प्राणी गाभा क्षेत्रात आणि ३१८ प्राणी बफरमध्ये आढळले. पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात नऊ आणि बफरमध्ये नऊ असे एकूण १८ वाघ दिसले. हे मुख्यतः देवलापार आणि पूर्व पेंच या वनपरिक्षेत्रात दिसले तर संपूर्ण बफर मधील वाघ हे नागलवाडी वनपरिक्षेत्रात दिसले. पेंचमध्ये एकूण सहा बिबट दिसले. त्यापैकी चार कोरमध्ये आणि दोन बफरमध्ये होते. उमरेड-पवनी-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्यात एकूण ६५७ प्राणी दिसले. त्यापैकी उमरेड क्षेत्रात पाच, पवनी येथे एक तर कुही क्षेत्रात तीन अशा एकूण नऊ वाघांचे तर दोन बिबट्यांचे दर्शन झाले. इतर प्राण्यांमध्ये सांबर, चितळ, रानडुक्कर, नीलगाय, माकड, गवा या प्राण्यांचे दर्शन झाले. चोरबाहुली गाभा क्षेत्रात चांदी अस्वल आढळले. एकूण २० अस्वले दिसून आले. यापैकी १२ अस्वले निव्वळ पवनी (एकसंघ नियंत्रण) मध्ये दिसले. पूर्व पेंच कोर आणि पवनी (एकसंघ नियंत्रण) बफरमध्ये प्रत्येकी दोन उदमांजर आढळले. कोल्ह्याची ३६ निरीक्षणे प्रामुख्याने पूर्व पेंच आणि चोरबाहुली या वन क्षेत्रात दिसले. तर भेकर हरणाची २८ प्रत्यक्ष निरीक्षणे आढळली. त्यापैकी ५० टक्के चोरबाहुली क्षेत्रात होती.